एअर इंडिया इमारत विक्रीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2018 00:56 IST2018-12-13T00:55:29+5:302018-12-13T00:56:29+5:30
आर्थिक अरिष्टात सापडलेल्या एअर इंडियाने मुंबईतील नरिमन पॉइंट येथील २३ मजली इमारत विक्रीसाठी काढली आहे.

एअर इंडिया इमारत विक्रीस
मुंबई : आर्थिक अरिष्टात सापडलेल्या एअर इंडियानेमुंबईतील नरिमन पॉइंट येथील २३ मजली इमारत विक्रीसाठी काढली आहे. एअर इंडियाने वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार ३१ डिसेंबरपर्यंत या इमारतीच्या खरेदीसाठी बोली लावता येईल.
महाराष्ट्र राज्य सरकारकडून एअर इंडियाने ही जागा ९९ वर्षांच्या भाडेकरारावर घेतली असून, या जागेवर एअर इंडियाची २३ मजल्यांची दिमाखदार इमारत सध्या उभी आहे. या इमारतीत २ भूमिगत मजले आहेत. नरिमन पॉइंट येथे ७,५१२ चौ.मी. जमिनीवर ही इमारत उभारण्यात आली आहे. सध्या या इमारतीमधील फ्लॅट भाड्यावर देण्यात आले आहेत. ४ लाख ९९ हजार ९९८ चौ.फू. जागा उपलब्ध आहे. या इमारतीतील २३ मजल्यांपैकी १७ मजले सध्या भाड्यावर देण्यात आलेले आहेत.
या इमारतीच्या २२व्या मजल्यावर ५ हजार चौ.फूट जागा एअर इंडियाच्या कार्यालयासाठी राखून ठेवण्यात येईल. या शिवाय इमारतीवर दिमाखात झळकत असलेला एअर इंडियाचा लोगो तसाच कायम ठेवावा लागेल, असे जाहिरातीमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय इमारतीचे नावदेखील एअर इंडिया इमारत असेच कायम ठेवावे लागेल, अशी अट टाकण्यात आली आहे. भाड्यापोटी एअर इंडियाला वार्षिक १०७ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते.