मुख्य वैमानिक सुमित सभरवाल मुंबईचे रहिवासी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 07:29 IST2025-06-13T07:28:57+5:302025-06-13T07:29:14+5:30
Ahmedabad Air India Flight AI171 Crash : अहमदाबादमधील दुर्घटनाग्रस्त विमानाचे मुख्य वैमानिक सुमित सभरवाल हे मुंबईच्या पवई परिसरातील हिरानंदानी संकुलात वास्तव्यास होते. हिरानंदानी समूहात जलवायू विहार नावाचा एक सेक्टर आहे. यामध्ये प्रामुख्याने लष्कराचे आणि हवाई दलाच्या निवृत्त अधिकाऱ्यांचे वास्तव्य आहे. तेथेच ते राहात होते.

मुख्य वैमानिक सुमित सभरवाल मुंबईचे रहिवासी
मुंबई - अहमदाबादमधील दुर्घटनाग्रस्त विमानाचे मुख्य वैमानिक सुमित सभरवाल हे मुंबईच्या पवई परिसरातील हिरानंदानी संकुलात वास्तव्यास होते. हिरानंदानी समूहात जलवायू विहार नावाचा एक सेक्टर आहे. यामध्ये प्रामुख्याने लष्कराचे आणि हवाई दलाच्या निवृत्त अधिकाऱ्यांचे वास्तव्य आहे. तेथेच ते राहात होते.
सभरवाल यांच्या इमारतीमध्ये राहणाऱ्या पामेला यांनी सांगितले की, गेली अनेक वर्षे आम्ही एकाच इमारतीमध्ये राहतो. सुमित यांचे इमारतीमधील प्रत्येकाशी चांगले संबंध होते. येथे ते त्यांच्या आई-वडिलांसोबत राहात होते. काही काळापूर्वी त्यांच्या आईचे निधन झाले. त्यांची बहीण लवकरच घरी पोहोचणार आहे. या घटनेची माहिती समजल्यानंतर आम्हा सर्वच रहिवाशांना धक्का बसला आहे. या घटनेनंतर अनेक रहिवासी आणि काही राजकीय नेत्यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या वडिलांचे सांत्वन केले.
वैमानिक सुमित सभरवाल यांना होता एकूण ८२०० तासांच्या उड्डाणाचा अनुभव
कॅप्टन सुमित सभरवाल यांच्याकडे एकूण ८२०० तासांच्या विमान उड्डाणाचा अनुभव होता. तर त्या विमानाचे सह-वैमानिक क्लाईव्ह कुंदर यांना ११०० तासांच्या विमान उड्डाणाचा अनुभव होता. डीजीसीएने दिलेल्या माहितीनुसार कॅप्टन सुमीत सभरवाल हे सदर विमान चालवत होते.
कॅप्टन सभरवाल हे एक वरिष्ठ प्रशिक्षक व वैमानिक (एलटीसी) होते. एलटीसी म्हणजे लाईन ट्रेनिंग कॅप्टन. हे अनुभवी वैमानिक आहेत जे इतर वैमानिकांना प्रशिक्षण देतात. इतका अनुभव गाठीशी असतानाही ही दुर्घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.