Join us  

आघाडी मजबूत करण्यासाठी अजितदादांची गरज - भुजबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 6:12 AM

महाराष्ट्र विकास आघाडी मजबूतपणे काम करायची असेल तर अजित पवार यांना सन्मानाने राष्ट्रवादीत परत आणावे लागेल

मुंबई : महाराष्ट्र विकास आघाडी मजबूतपणे काम करायची असेल तर अजित पवार यांना सन्मानाने राष्ट्रवादीत परत आणावे लागेल, शरद पवारसाहेबांनी आम्हाला त्यासाठी परवानगी द्यावी, असे भावनिक आवाहन माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी तीन पक्षांच्या बैठकीत केले.ते म्हणाले की सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि त्यांच्या राजीनाम्यानंतरच आपल्याकडे बहुमत नसल्याचे लक्षात आल्याने देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. अजितदादांसारख्या नेत्याची पक्षाला गरज आहे. पक्षाच्या स्थापनेपासून त्यांनी पक्ष उभारणीसाठी महत्त्वाचे योगदान दिले आहे. पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील यांना माझे आवाहन आहे की त्यांनी अजितदादांना परत आणावे. पवारसाहेबांनी जे घडले ते सगळे पोटात घेऊन त्यासाठीची परवानगी द्यावी, अशी विनंती भुजबळ यांनी केली. त्यावेळी राष्ट्रवादीच्या आमदारांनी जोरदार टाळ्या वाजवून भुजबळ यांच्या भूमिकेचे समर्थन केले. एकच वादा, अजितदादा अशी घोषणा त्यांनी दिली.भुजबळ यांनी बैठकीत हशा पिकवला. मी ज्या तीन पक्षांमध्ये राहिलो त्या तीन पक्षांचे सरकार आज येत आहे याचा विशेष आनंद होत आहे. अनेक जुने मित्र (शिवसेनेचे नेते) मला आज भेटले, असे ते म्हणाले.दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन झाले : पाटीलमहाराष्ट्राच्या इतिहासात सर्वात कमी अवधीसाठी मुख्यमंत्री होण्याचा मान देवेंद्र फडणवीस यांनी मिळविला आहे. दीड दिवसांचा गणपती बसविला जातो आणि त्याचे विसर्जन केले जाते. तेच आपण आज अनुभवत आहोत, असा चिमटा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काढला.अजित पवारांच्या समर्थनार्थ ट्रायडंटबाहेर घोषणा : बंडखोरी करून बाहेर पडलेले आणि उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिलेले अजित पवार यांचे समर्थक तीन पक्षांच्या बैठकीच्या बाहेर (ट्रायडंट हॉटेल) मोठ्या संख्येने जमले होते. अजितदादा वुई लव्ह यू, असे फलक त्यांच्या हातात होते आणि त्यांच्या समर्थनाच्या जोरदार घोषणाही ते देत होते.महाराष्ट्र विकास आघाडीतीन पक्षांच्या आघाडीचे नामकरण आधी माध्यमांनी महाशिवआघाडी असे केले होते. नंतर ते महाविकास आघाडी असे करण्यात आले. तथापि, आजच्या बैठकीत महाराष्ट्र विकास आघाडी असे नाव निश्चित करण्यात आले.

टॅग्स :छगन भुजबळअजित पवारराष्ट्रवादी काँग्रेसमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019