Join us

राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर रातोरात चक्रे फिरली; अखेर 'ते' अनधिकृत बांधकाम हटवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2023 09:59 IST

प्रशासनाने ही तातडीने दखल घेतल्याबाबत मनसेने प्रशासनाचे कौतुक केले आहे.

मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गुढीपाडवा मेळाव्यात माहिमच्या समुद्रात झालेल्या अनधिकृत बांधकामाबाबत व्हिडिओ दाखवण्यात आला. प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे गेल्या २ वर्षात समुद्रात कथित मजार उभारण्यात आली. त्याठिकाणी अनधिकृत बांधकाम करण्यात आले असा दावा राज ठाकरे यांनी केला होता. जर महिनाभरात या जागेवर कारवाई झाली नाही तर त्याचशेजारी सर्वात मोठे गणपती मंदिर बांधू असा इशारा राज यांनी दिला होता. 

राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर रातोरात प्रशासकीय चक्रे वेगाने फिरली. याठिकाणची जागा महापालिका नव्हे तर मुंबई जिल्हाधिकाऱ्यांच्या अख्यारित असल्याने ही कारवाई त्यांच्याकडून केली जाईल असं मनपाने सांगितले. गुरुवारी सकाळी सकाळी संबंधित यंत्रणांचे अधिकारी घटनास्थळी पोहचले. त्याठिकाणी जागेचे मॅपिंग करण्यात आले. त्यानंतर या जागेचे कुठे नोंद आहे का याची पडताळणी करण्यात आली. मात्र ही मजार ६०० वर्ष जुनी असल्याची नोंद असल्याचं सूत्रांकडून माहिती मिळाली. परंतु सदर जागेवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम झाल्याचं प्रशासनाला आढळून आले. 

भविष्यात कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी प्रशासनाने तातडीने अनधिकृत बांधकामावर हातोडा मारला त्याचसोबत जेसीबीने सर्व बेकायदेशीर बांधकाम हटवण्यास आले आहे. संपूर्ण ही जागा पूर्ववत करण्यात आली आहे. रात्री उशिरा सभा संपल्यानंतर त्यानंतर काही जणांनी तिथे जाण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी बंदोबस्त वाढवल्यामुळे कुणालाही तिथे जाता आले नाही. सकाळी साडेसातच्या सुमारास प्रशासनाने मनुष्यबळ वापरून याठिकाणी अनधिकृत बांधकामावर हातोडा मारण्यात आला. 

मनसेनं केले प्रशासनाचं कौतुकतोडकाम पूर्ण झाल्याचं मनसे नेत्यांना प्रशासनाकडून कळवण्यात आले. प्रशासनाने ही तातडीने दखल घेतल्याबाबत मनसेने प्रशासनाचे कौतुक केले आहे. त्याचसोबत इतर ठिकाणीही अशी बांधकामे होत असतील तर त्याठिकाणी कारवाई व्हावी. तसेच त्या जागेवर पुन्हा असे बांधकाम होणार नाही याची दक्षता प्रशासनासोबत स्थानिकांनीही घ्यावी. यापुढे असे होऊ नये हे सगळ्यांनीच पाहिले पाहिजे असं मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :राज ठाकरेमनसेपोलिस