बेस्ट बसची दुप्पट दरवाढ 'या' तारखेपासून लागू; आता प्रवाशांना मोजावे लागणार इतके पैसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 12:32 IST2025-05-06T12:20:16+5:302025-05-06T12:32:41+5:30

बृहन्मुंबई महानगरपालिकेने मंजुरी दिल्यानंतर बेस्ट प्रशासनाने बस भाडेवाडीची तारीख जाहीर केली आहे.

After the approval of the BMC BEST administration has announced the date of the bus fare | बेस्ट बसची दुप्पट दरवाढ 'या' तारखेपासून लागू; आता प्रवाशांना मोजावे लागणार इतके पैसे

बेस्ट बसची दुप्पट दरवाढ 'या' तारखेपासून लागू; आता प्रवाशांना मोजावे लागणार इतके पैसे

BEST Bus Price Hike:मुंबईकरांसाठी लोकलप्रमाणे सर्वात मोठी वाहतूक व्यवस्था असलेल्या बेस्ट बसबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. बेस्टला आर्थिक कोंडीतून बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने तिकीटाच्या दरात वाढ केली आहे.बेस्टच्या तिकीट दरात दुपटीने वाढ करण्याच्या निर्णयास मुंबई महापालिकेने  मंजुरी दिली असून ही दरवाढ गुरुवारपासून म्हणजेच ८ मेपासून लागू होणार आहे. बेस्ट प्रशासनाने यासंदर्भात अधिकृत परिपत्रक काढून याची माहिती दिली आहे.

ठरावाद्वारे बेस्ट उपक्रमाच्या प्रवासभाडे सुसूत्रिकरणास बेस्ट समिती आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेची मंजुरी प्राप्त झालेली असून या प्रस्तावित प्रवासभाडयाची अंमलबजावणी गुरवार ८ मे २०२५ पासून करण्यात येणार असल्याचे या परिपत्रकात म्हटलं आहे. त्यामुळे आता प्रवाशांना बेस्टच्या प्रवासासाठी दुप्पट पैसे द्यावे लागणार आहेत. म्हणजेच पाच किमीसाठी ५ रुपयांना मिळणारे तिकीट १० रुपये, तर एसी बसचे ६ रुपयांचे तिकीट १२ रुपये इतके होणार आहे. तर मासिक पासमध्ये तब्बल ३५० रुपयांची वाढ होणार आहे. प्रत्येक पाच किलोमीटरमागे पाच रुपयांचे भाडे वाढणार आहे.

बेस्टने सात वर्षांपूर्वी म्हणजे २०१८ मध्ये तिकीट दरात वाढ केली होती. साध्या बसचे किमान भाडे ८ रुपये, तर वातानुकूलित बसचे किमान भाडे २० रुपये करण्यात आले होते. २०१९ मध्ये हा निर्णय बदलण्यात आला. तत्कालीन महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी बेस्टच्या भाड्यात कपात केली होती. साध्या बसचे किमान भाडे ५ रुपये, तर वातानुकूलित बसचे किमान भाडे ६ रुपये करण्यात आले होते. 

तोट्यात असलेल्या बेस्ट उपक्रमाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली. या बैठकीत बेस्ट प्रशासनाने भाडेवाढ करण्याचा मुद्दा मांडला होता. त्यानंतर बेस्ट बसच्या तिकीट दरात वाढ करण्यास मुंबई महापालिका प्रशासनाने मंजुरी दिल्याचे पालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांनी सांगितले होते.

बेस्ट बस भाडेवाढ

५ किमी अंतरासाठी १० रुपये  

१० किमी अंतरासाठी १५ रुपये  

१५ किमी अंतरासाठी २० रुपये

२० किमी अंतरासाठी ३० रुपये 

एसी बसच्या तिकिट दरात वाढ

सध्या ५ किमी अंतरासाठी ६ रुपये तिकीट आहे. त्यात वाढ झाल्यानंतर १२ रुपये झालं आहे.

याच प्रमाणे १० किमी अंतरासाठी १३ रुपयांऐवजी २० रुपये, तर १५ किमी अंतरासाठी १९ रुपयांऐवजी आता ३० रुपये मोजावे लागणार आहेत. २० किमी अंतरासाठी ३५ रुपये तिकीट आकारले जाणार आहे. 

मासिक पासही महागला

५ किमी अंतरासाठी सध्या ४५० रुपयांचा पास मिळत होतो तो आता ८०० रुपयांना मिळणार आहे.

१० किमी अंतरासाठीचा पास भाडेवाढीनंतर १२५० रुपयांना मिळणार आहे. १५ किमी अंतरासाठीचा पास १६५० रुपयांऐवजी १७०० रुपयांना मिळणार आहे. २० किमी अंतरासाठीचा पासही २६०० रुपयांना मिळेल. 

एसी बसचा पासही महाग

५ किमी अंतराच्या एसी बसच्या पाससाठी भाडेवाढीनंतर ११०० रुपये द्यावे लागणार आहेत. तसेच १० किमी अंतरासाठीचा पास १४०० रुपयांऐवजी १७०० रुपयांना मिळणार आहे. १५ किमीचा पास २१०० ऐवजी २३००, तर २० किमीसाठीचा पास २७०० रुपयांऐवजी ३५०० रुपयांना मिळणार आहे.
 

Web Title: After the approval of the BMC BEST administration has announced the date of the bus fare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.