आरक्षणानंतर काँग्रेसकडे इच्छुकांची भाऊगर्दी, उमेदवारीसाठी १,५०० पेक्षा अधिक अर्जांचे वितरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 14:05 IST2025-11-13T14:05:01+5:302025-11-13T14:05:25+5:30
BMC Election: मुंबई महापालिकेत महाविकास आघाडीबाबत अजून चित्र स्पष्ट झालेले नाही. एकीकडे मनसेला सोबत घेण्याची उद्धवसेनेने पूर्ण तयारी केली आहे. मनसेकडून त्याबाबत कोणताही प्रस्ताव आलेला नसल्याने महाआघाडीत त्यावर अजून चर्चा झालेली नाही. दुसरीकडे १,५०० पेक्षा जास्त इच्छुकांनी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज घेतले आहेत.

आरक्षणानंतर काँग्रेसकडे इच्छुकांची भाऊगर्दी, उमेदवारीसाठी १,५०० पेक्षा अधिक अर्जांचे वितरण
मुंबई - मुंबई महापालिकेत महाविकास आघाडीबाबत अजून चित्र स्पष्ट झालेले नाही. एकीकडे मनसेला सोबत घेण्याची उद्धवसेनेने पूर्ण तयारी केली आहे. मनसेकडून त्याबाबत कोणताही प्रस्ताव आलेला नसल्याने महाआघाडीत त्यावर अजून चर्चा झालेली नाही. दुसरीकडे १,५०० पेक्षा जास्त इच्छुकांनी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज घेतले आहेत.
मंगळवारी आरक्षित वॉर्डांचे चित्र स्पष्ट झाले. त्यामुळे आपल्या सोयीनुसार आरक्षित तसेच खुल्या गटाचा वॉर्ड आलेल्या इच्छुकांनी आता काँग्रेसकडून उमेदवारीसाठी अर्ज घेण्यास धावपळ सुरू केली आहे. काँग्रेसकडे कोणत्या प्रवर्गासाठी किती अर्ज आले आहेत, याची १६ नोव्हेंबरपर्यंत छाननी पूर्ण होईल. आगामी निवडणुकीत उद्धवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महाआघाडीत मनसेला सहभागी करून घेण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. उद्धवसेना व राष्ट्रवादी शरद पवार गट त्याबाबत आग्रही आहे.
तेव्हा लढवल्या होत्या २२४ जागा
२०१७ च्या निवडणुकीत काँग्रेसने २२४ जागा लढविल्या होत्या. त्यापैकी ३१ जागांवर विजय मिळविला होता.
उत्तर मध्य मुंबईतून ३०० पेक्षा जास्त, उत्तर पूर्वमधून २५० पेक्षा जास्त अर्ज आले आहेत. उर्वरित चार विभागांकडून प्रत्येकी २०० पेक्षा जास्त अर्ज उमेदवार घेऊन गेले आहेत. त्यांचे वर्गीकरण करण्याचे काम १६ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होईल.
- सुरेश राजहंस, प्रवक्ते, मुंबई काँग्रेस