यदु जोशी
मुंबई : केंद्रीय भाजपने यंदाचे वर्ष प्रशिक्षण वर्ष म्हणून जाहीर केले असून, पक्षातील प्रत्येकाला प्रशिक्षण घेणे अनिवार्य असेल. त्यासाठी देशभर महाअभियान राबविले जाणार असून, महाराष्ट्रात त्यासाठीची सुरुवात २० फेब्रुवारीपासून होणार आहे.
भाजपचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री आणि महाराष्ट्राचे प्रभारी शिवप्रकाश हे या महाअभियानाचे राष्ट्रीय संयोजक असतील, त्यामुळे महाराष्ट्रातील महाअभियान यशस्वी होत आहे की नाही, यावर त्यांची विशेष नजर असेल. गोवा, गुजरात, महाराष्ट्र, दादरा-नगर हवेली, दीव-दमण, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या पश्चिम क्षेत्रासाठीचे प्रभारी म्हणून गुजरातमधील माजी खासदार के. सी. पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘पंच प्रण’ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सांगितलेले पंच परिवर्तन याची माहिती शिबिर परिसरात प्रदर्शित केली जाईल.
संरक्षक कठड्याचा भाग का कोसळला? समिती शोधणार कामाची गुणवत्ता, देखरेख, नियमावलींची तपासणी
...आधी कार्यकर्ता बना
नेतागिरी जरूर करा, पण त्यासाठी आधी कार्यकर्ता बना आणि भाजपचा विचार समजून आचरणात आणा, हा या प्रशिक्षण महाअभियानाचा मुख्य गाभा असेल. मूळ भाजपचा कार्यकर्ता, नेता आणि बाहेरून आलेले अशा सगळ्यांनाच प्रशिक्षण घेणे सक्तीचे असेल.
पुढच्या पाच - पंचवीस वर्षांसाठी कार्यकर्त्यांची वैचारिक फळी निर्माण करणे हा या महाअभियानाचा उद्देश आहे. ‘व्यक्ती निर्माणातून संघटन निर्माण आणि संघटन निर्माणातून राष्ट्रनिर्माण’ ही प्रशिक्षणाची थीम असेल. भाजपच्या सर्व १,२२३ मंडळांमध्ये प्रशिक्षण शिबिरे होतील.
प्रचाराच्या आधुनिक साधनांचे देणार प्रशिक्षण
भाजपचा कार्यकर्ता, नेता हा पक्षाची ध्येयधोरणे, विचारांपासून ढळता कामा नये, पक्षाचा मूळ विचार आत्मसात करतानाच त्याने तो आधुनिक पद्धतीने अन्य कार्यकर्ते आणि जनसामान्यांसमोर मांडावा यासाठी प्रचार-प्रसाराच्या आधुनिक साधनांचे प्रशिक्षणही शिबिरांमध्ये देण्यात येणार आहे.
त्यात पीपीटी, रील तयार करणे असेही विषय असतील. मंडळापासून प्रदेशापर्यंत प्रशिक्षण म्हणून निवड झालेल्यांचे प्रशिक्षण आधी घेतले जाईल आणि नंतर सर्वांसाठी शिबिरे घेतली जातील. प्रशिक्षणार्थींकडून शुल्क आकारले जाणार आहे.
राज्यात २० पासून प्रारंभ
महाराष्ट्रातील महाअभियानाची सुरुवात २० फेब्रुवारीला एका बैठकीच्या निमित्ताने होणार आहे. भाजपचे सर्व जिल्ह्यांचे अध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, १४ प्रदेश प्रशिक्षक, जिल्हा प्रशिक्षक यांची बैठक या दिवशी मुंबईत होईल.
२४ फेब्रुवारीला केंद्रीय संघटन मंत्री बी. एल. संतोष यांच्या उपस्थितीत क्षेत्रीय बैठक होईल. त्यानंतर वर्षभर प्रदेश, जिल्हा आणि मंडळ पातळीवर निवासी प्रशिक्षण वर्ग होणार आहेत. फक्त शक्तिकेंद्र प्रमुख आणि बूथप्रमुखांचे प्रशिक्षण ऑनलाइन होईल.
प्रशिक्षण कशाचे?
पक्षाची वैचारिक बांधिलकी, कार्यपद्धती, कार्यकर्त्यांचे वर्तन, पक्षाचा इतिहास आणि विकास, कार्यकर्त्यांमध्ये समाजाप्रति संवेदनशीलता जागृत करणे, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील आव्हाने, घटना याबाबत परसविण्यात येणाऱ्या ‘फेक नरेटीव्ह’ला उत्तर कसे द्यायचे, सरकारच्या योजनांशी जनसामान्यांना कसे जोडावे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर याबाबतचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
प्रशिक्षण शिबिराची जागा हायफाय नसावी. प्रशिक्षणार्थींसाठीचे भोजन साधेच असावे आणि निवास व्यवस्थाही अलिशान नसेल, याची काळजी घ्यावी असे बजावण्यात आले आहे.
Web Summary : BJP prioritizes mandatory training for all members, emphasizing ideological grounding and modern communication skills. A nationwide campaign starts February 20th in Maharashtra, aiming to build a strong, ideologically driven cadre ready for future challenges. The focus is on grassroots development and national building.
Web Summary : भाजपा सभी सदस्यों के लिए प्रशिक्षण अनिवार्य करती है, वैचारिक आधार और आधुनिक संचार कौशल पर जोर देती है। महाराष्ट्र में 20 फरवरी से एक राष्ट्रव्यापी अभियान शुरू होगा, जिसका उद्देश्य भविष्य की चुनौतियों के लिए तैयार, विचारधारा से प्रेरित एक मजबूत कार्यकर्ता दल का निर्माण करना है। ज़मीनी स्तर के विकास और राष्ट्र निर्माण पर ध्यान केंद्रित किया गया है।