संरक्षक कठड्याचा भाग का कोसळला? समिती शोधणार कामाची गुणवत्ता, देखरेख, नियमावलींची तपासणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2026 05:10 IST2026-02-15T05:09:54+5:302026-02-15T05:10:17+5:30

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) अंतर्गत मुंबई मेट्रो लाईन ४ (वडाळा–कासारवडवली) प्रकल्पाचे काम सुरू आहे.

Why did part of the protective wall collapse? Committee to investigate quality of work, supervision, inspection of regulations | संरक्षक कठड्याचा भाग का कोसळला? समिती शोधणार कामाची गुणवत्ता, देखरेख, नियमावलींची तपासणी

संरक्षक कठड्याचा भाग का कोसळला? समिती शोधणार कामाची गुणवत्ता, देखरेख, नियमावलींची तपासणी

मुंबई : मुलुंड अग्निशमन केंद्राजवळ मेट्रो बांधकामावेळी संरक्षक कठड्याचा भाग रिक्षासह लगतच्या वाहनावर कोसळून एकाचा मृत्यू, तर दोनजण जखमी झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. या घटनेनंतर आता एमएमआरडीएचे संचालक (प्रकल्प) बसवराज एम. भद्रगोंड यांच्या अध्यक्षतेखाली या घटनेची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) अंतर्गत मुंबई मेट्रो लाईन ४ (वडाळा–कासारवडवली) प्रकल्पाचे काम सुरू आहे. मुलुंड अग्निशमन केंद्राजवळ, बांधकामाधीन मुंबई मेट्रो लाईन ४ प्रकल्पातील पिअर क्रमांक १९६ जवळ सिमेंटचा संरक्षक कठडा शनिवारी दुपारी १२:१५ च्या सुमारास कोसळल्याची घटना घडली. या घटनेनंतर एमएमआरडीएवर चारही बाजूने टीका होत असतानाच आता या घटनेच्या चौकशीसाठी एमएमआरडीएकडून उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे.

बसवराज एम. भद्रगोंड यांच्या अध्यक्षतेखालील ही समिती बांधकाम पद्धती, गुणवत्ता नियंत्रण, देखरेख यंत्रणा आणि नियमांचे पालन यांची तपासणी करणार आहे. समितीकडून सविस्तर अहवाल मागविला आहे. मृतांच्या कुटुंबीयांना एमएमआरडीएकडून आर्थिक मदत दिली जाणार आहे. जखमींच्या उपचारांच्या खर्चाची जबाबदारी एमएमआरडीए उचलणार आहे. दरम्यान, एमएमआरडीएने मेट्रो ४ मार्गिकेचे पॅकेज १० चे कार्यकारी अभियंता सत्यजित साळवे यांना निलंबित केले आहे.

सोशल मीडियावर वेगळाच व्हिडीओ व्हायरल

सामाजिक माध्यमांवर यापूर्वी निदर्शनास आलेल्या वेगळ्या ठिकाणाचे काही व्हिडीओ या घटनेशी जोडून प्रसारित केले जात आहेत. याबाबत एमएमआरडीएने स्पष्ट केले आहे की, ही घटना पियर क्रमांक पी १९६ येथे घडली असून, सामाजिक माध्यमांवर प्रसारित होत असलेले दृश्य हे वेगळ्या ठिकाणाचे आहे. दोन्ही ठिकाणे कॉरिडॉरमध्ये भौगोलिकदृष्ट्या वेगळी आहेत. तरीदेखील पारदर्शकता राखण्यासाठी या बाबीचाही चौकशीत समावेश केला जाणार आहे.

कामाला तात्पुरती स्थगिती

प्रकल्प पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत परिसर सुरक्षित केला. संबंधित भागाला बॅरिकेड्स लावण्यात आले असून, संरचनात्मक सुरक्षिततेचे परीक्षण सुरू करण्यात आले आहे. यासाठी महापालिका, आपत्ती व्यवस्थापन विभाग, स्थानिक पोलिस व अग्निशमन दल यांच्या समन्वयाने तपास सुरू आहे. प्राथमिक तपास पूर्ण होईपर्यंत संबंधित भागातील बांधकाम कामे तात्पुरती स्थगित करण्यात आली आहेत.

अहवालानंतरच होणार आवश्यक ती कारवाई

सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असून, चौकशी अहवालानुसार जबाबदारी निश्चित करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक ती दुरुस्तीची पावले उचलली जाणार असल्याचे एमएमआरडीएने सांगितले आहे. चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील माहिती जाहीर करण्यात येईल.

Web Title : मेट्रो गार्डरेल हादसा: गुणवत्ता, देखरेख और नियमों की जांच करेगी समिति

Web Summary : मुंबई मेट्रो स्थल पर गार्डरेल गिरने से हुई मौत के बाद, एमएमआरडीए समिति निर्माण गुणवत्ता, देखरेख और नियमों के अनुपालन की जांच करेगी। काम रुका, और कार्यकारी अभियंता निलंबित। पीड़ित परिवार को वित्तीय सहायता दी जाएगी।

Web Title : Metro Guardrail Collapse: Committee to Probe Quality, Oversight, and Rules

Web Summary : Following a fatal guardrail collapse at a Mumbai Metro site, an MMRDA committee will investigate construction quality, oversight, and rule compliance. Work is paused, and the executive engineer is suspended. Financial aid will be provided to the victim's family.