Join us  

जितन प्रसाद यांच्या भाजपा प्रवेशानंतर मिलिंद देवरांनी व्यक्त केली इच्छा 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2021 5:07 PM

जितन प्रसाद यांच्या भाजपा प्रवेशानंतर माजी खासदार आणि भाजपा नेते निलेश राणे यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना टोला लगावला आहे.

ठळक मुद्देजितन प्रसाद यांच्या भाजपा प्रवेशानंतर माजी खासदार आणि भाजपा नेते निलेश राणे यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना टोला लगावला आहे.

मुंबई - काही काळापर्यंत राहुल गांधींचे निकटवर्तीय समजले जाणारे उत्तर प्रदेशमधीलकाँग्रेसचे दिग्गज नेते जितिन प्रसाद यांनी आज दुपारी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीला काही महिने उरले असताना जितिन प्रसाद यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने काँग्रेसला जोरदार धक्का बसला आहे. जितिन प्रसाद यांच्या भाजपामधील प्रवेशानंतर दोन्ही पक्षांतील नेत्यांमधून प्रतिक्रिया उमटत आहेत. काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनीही ट्विट करुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.  

जितन प्रसाद यांच्या भाजपा प्रवेशानंतर माजी खासदार आणि भाजपा नेते निलेश राणे यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना टोला लगावला आहे. जितिन प्रसाद यांच्या भाजपा प्रवेशानंतर केलेल्या ट्विटमध्ये निलेश राणे म्हणाले की, राहुल गांधींच्या सगळे जवळचे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. राहुल गांधींच्या स्वभावाचाचं हा एक भाग आहे. मला सगळं कळतं आणि मीच सर्वात शहाणा हा स्वभाव काँग्रेसला घेऊन बुडाला आहे. आता राहुल गांधी यांनी स्वतः भाजपात प्रवेश करावा, हाच त्यांच्यासमोर शेवटचा पर्याय उरला आहे, असा टोला निलेश राणेंनी लगावला.   काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री मिलिंद देवरा यांनी ट्विट करुन, पक्षातील इतर सहकाऱ्यांप्रति इच्छा व्यक्त केली. पक्षातील इतर सहकारी, मित्र आणि अनेक वजनदार सहकाऱ्यांनी आम्हाला सोडून जाऊ नये, असे मिलिंद देवरा यांनी म्हटलं आहे. भारतातील सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेस पार्टी पुन्हा एकदा उभारी घेऊल, असा मला विश्वास आहे. आजही आपल्याकडे एक मजबूत फळी आहे, ज्याचा वापर योग्य ताकदीने केल्यास त्यांचा मोठा फायदा होईल, असेही देवरा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.    

दरम्यान, आज उत्तर प्रदेशमधील युवा नेते जितीन प्रसाद यांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपामध्ये प्रवेश केला. जितीन प्रसाद यांना गेल्या काही काळापासून काँग्रेसने पक्षातील केंद्रापासून काहीसे दूर केले होते. मात्र त्यांनी उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक एक वर्षावर आली असताना पक्ष सोडून भाजपामध्ये जाणे पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. 

२००४ मध्ये जितीन प्रसाद यांनी शाहजहाँपूर येथून लोकसभेची निवडणूक जिंकून संसदेत प्रवेश केला होता. दरम्यान यूपीओ-१ च्या काळात त्यांना मंत्री बनवण्यात आले होते. तेव्हा त्या सरकारमधील युवा मंत्र्यांपैकी ते एक होते.  २००९ मध्ये जितीन प्रसाद यांनी धौराहा लोकसभा मतदारसंघातून लढून विजय मिळवला होता. यूपीए-२ सरकारच्या काळात त्यांनी पेट्रोलियम, रस्ते वाहतूक यासारखी महत्त्वाची खाती सांभाळली होती. मात्र २०१४ च्या निवडणुकीत उत्तर प्रदेशात आलेल्या जबरदस्त मोदी लाटेत त्यांचा पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर २०१७ मधील उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणुक आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतही त्यांचा पराभव झाला होता. या पराभवांनंतर ते काँग्रेसच्या राजकारणातील मुख्य प्रवाहापासून काहीसे बाजूला फेकले गेले होते.  

जितिन प्रसाद यांना भाजपाकडून बक्षीस ?

काँग्रेसला गुडबाय करत भाजपत प्रवेश केलेल्या जितिन प्रसाद (Jitin prasada) यांना मोठे बक्षीस मिळू शकते. भाजपकडून त्यांना विधान परिषदेवर पाठविले जाऊ शकते. पक्षातील उच्च पदावरील सुत्रांनी ही माहिती दिली. याशिवाय त्यांना, उत्तर प्रदेश भाजप अथवा राष्ट्रीय स्तरावरही संघटनेत मोठे पद मिळण्याची शक्यता आहे. भाजपत प्रवेश केल्यानंतर जितिन प्रसाद यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री पीयूष गोयलही उपस्थित होते. पीयूष गोयल यांनीच प्रसाद यांना पक्षाचे सदस्यत्व दिले आहे.

टॅग्स :काँग्रेसभाजपामुंबईउत्तर प्रदेशराहुल गांधी