मुंबई : गावदेवी येथील बाबुलनाथ मंदिर परिसरात पदपथावर झोपलेल्या तरुणाला मर्सिडीज कारने चिरडल्याची घटना ताजी असतानाच विक्रोळीत आणखीन एकाचा बळी गेला. भरधाव रिक्षाच्या धडकेत एकजण गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात नेताना रिक्षाने अन्य तीन पादचाऱ्यांना धडक दिल्याने खळबळ उडाली. विक्रोळी पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.बाबुलनाथ मंदिराजवळील अपघात ३१ जुलैच्या रात्री घडला. येथील ओरिएंटल क्लबच्या पदपथावर जगदीश नावाचा तरुणाचा अपघातीमृत्यू झाला. क्लबमध्ये येणारी एका मर्सिडीज कार पदपथावर चढली आणि जगदीश चिरडला गेला होता. दुसऱ्या घटनेत शनिवारी संध्याकाळी सातच्या सुमारास जोगेश्वरी-विक्रोळी जोड रस्यावरील बिंदू माधव चौकात (विक्रोळी) सिग्नलजवळ एका तरुणाला भरधाव रिक्षाने धडक दिली. अपघातात हा तरुण गंभीर जखमी झाला. तेथे तैनात असलेल्या पोलिसाने जखमीला त्याच रिक्षात घालून महात्मा फुले रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला. रुग्णालयात जात असताना रिक्षा चालकाने रस्त्यावरून पायी जाणाऱ्या आणखीन तिघांना धडक दिल्याने खळबळ उडाली. रिक्षा रुग्णालयात पोहोचेपर्यंत तरुणाला मृत घोषित केले. याप्रकरणी विक्रोळी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
गावदेवीपाठोपाठ विक्रोळीतही भरधाव वेगाचा आणखी एक बळी, जखमीला रुग्णालयात नेताना रिक्षाची तिघांना धडक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 10:22 IST