भाडेवाढीनंतर ‘यूपीआय’मुळे एसटीची कमाई वाढली
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 09:26 IST2025-01-31T09:26:49+5:302025-01-31T09:26:58+5:30
एसटी भाडेवाढ झाल्यापासून यूपीआयच्या माध्यमातून मिळणाऱ्या महसुलामध्ये दुपटीने वाढ झाली आहे.

भाडेवाढीनंतर ‘यूपीआय’मुळे एसटीची कमाई वाढली
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्य परिवहन महामंडळाने गेल्या आठ दिवसांत तिकीटविक्रीतून यूपीआयद्वारे ८ कोटी ७० लाख उत्पन्न मिळवले आहे. भाडेवाढीनंतर यूपीआयच्या माध्यमातून तिकीट खरेदीत दुपटीने वाढ झाली आहे. एकीकडे भाडेवाढीमुळे सुट्या पैशांवरून वाद होण्याची लक्षणे असताना एसटीच्या तिकीट खरेदीसाठी यूपीआयचा पर्याय सोयीचा ठरत आहे.
एसटी महामंडळाच्या तिकीट दरामध्ये १ रुपयाच्या पटीत भाडेवाढ करण्यात आल्याने सुट्या पैशांवरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यासाठी महामंडळाकडून कंडक्टरकडे १०० रुपयांची चिल्लर ॲडव्हान्स देण्यात येत आहे. त्याबरोबरच यूपीआयच्या माध्यमातून ऑनलाईन पैसे देऊन तिकीट घेण्याची सुविधाही देण्यात आली आहे. त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच एसटी भाडेवाढ झाल्यापासून यूपीआयच्या माध्यमातून मिळणाऱ्या महसुलामध्ये दुपटीने वाढ झाली आहे.
भाडेवाढीपूर्वी यूपीआय महसूल
दिनांक (जानेवारी) महसूल
२१ ८७,५८,०६०
२२ ८६,५०,९०५
२३ ८४,२३,०२५
२४ ६७,९६,०१८
भाडेवाढीनंतरचा यूपीआय महसूल
दिनांक (जानेवारी) महसूल
२६ १ कोटी ५३ लाख
२७ १ कोटी ४६ लाख
२८ १ कोटी २५ लाख
२९ १ कोटी १९ लाख