Join us

लोणीकर २०१४ आधी विनाकपड्याचे फिरत होते का?; विधानसभेतून निलंबित केल्यानंतर नाना पटोलेंचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 14:08 IST

विधानसभा अध्यक्षांनी निलंबित केल्यानंतर नाना पटोले यांनी आपण कोणतेही चुकीचे विधान केले नसल्याचे म्हटलं.

Nana Patole: भाजपाचे आमदार आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचे पडसाद पावसाळी अधिवेशनात पाहायला मिळाले. काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी बबनराव लोणीकर यांनी केलेल्या विधानावरुन भाजपवर जोरदार टीका केली. शेतकऱ्यांना पंतप्रधान मोदींनी पैसे दिले, तुमच्या अंगावरचे कपडे सरकारने दिलं असं विधान लोणीकर यांनी केलं होतं. त्यावरुन शेतकऱ्यांचा अपमान केल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागावी अशी मागणी नाना पटोले यांनी केली. नाना पटोले यांनी मागणी लावून धरल्याने विधानसभा अध्यक्षांनी त्यांना निलंबित केले. त्यानंतर बोलताना नाना पटोले यांनी शेतकऱ्यांचा अपमान करत असेल तर मी शांत बसणार नाही असं म्हटलं आहे.

बबनराव लोणीकर यांनी काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमता बोलताना टीका करणाऱ्यांवर वादग्रस्त विधान केलं होतं. गावात जे काही मिळालं ते गेल्या २५ वर्षांत मीच दिलं. ते कुचळवाट्यावर बसलेले पाच-सहा कारटे… त्याच्या मायचा पगार बबनराव लोणीकरने केला. त्याच्या बापाला पेरणीसाठी सहा हजार रुपये पंतप्रधान मोदी यांनी दिले. तुझ्या मायच्या, तुझ्या बहिणीच्या व बायकोच्या नावावर लाडकी बहीण योजनेचे पैसे आले. तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारने दिले आहेत, असं विधान केलं होतं. त्यावरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी लोणीकर यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यानंतर नाना पटोले यांनी विधानसभेत बबनराव लोणीकर आणि कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबद्दल केलेल्या विधानांबद्दल संताप व्यक्त केला.

माणिकराव कोकाटे आणि बबनराव लोणीकर यांनी केलेल्या विधानांबद्दल मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शेतकऱ्यांची माफी मागावी अशी मागणी नाना पटोले यांनी केली. त्यानंतर विरोधकांनीही मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी अशी मागणी लावून धरली. नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षांकडे जाऊन  माफीची मागणी केली. गोंधळ वाढल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नाना पटोले यांना एका दिवसासाठी निलंबित केले. नाना पटोले यांनी सभागृहाबाहेर येत २०१४ आधी बबनराव लोणीकर हे विना कपड्यांचे फिरत होते का? अशी टीका केली.

"भाजपच्या आमदाराने वक्तव्य केलं की, शेतकऱ्याच्या पत्नीला कपडे पंतप्रधान मोदी देतात. शेतकऱ्यांना चप्पल, चड्डी, बनियानसुद्धा तेच देतात. त्यांच्या मुलांना सुरक्षा पंतप्रधान मोदी देतात. २०१४ आधी बबनराव लोणीकर हे विना कपड्यांचे फिरत होते का? ज्या प्रकार भाजप शेतकऱ्यांना अपमानित करण्याचे काम करत आहे. मोदी तुमचे बाप असतील, राज्यातील शेतकऱ्यांचे नव्हे. हीच भूमिका मी विधानसभेत मांडली. मी कोणतेही चुकीचे विधान केलेलं नाही. भाजप आणि हे सरकार शेतकऱ्यांचा अपमान करत असेल तर मी शांत बसणार नाही. हा शेतकऱ्यांचा लढा आम्ही लढणार. शेतकऱ्यांची कर्जमाफी अजूनही केलेली नाही. नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्याचे मोठं नुकसान झालं असून अजून त्यांना मदत मिळालेली नाही. शेतकऱ्यांच्या विरोधात असलेल्या व्यवस्थेच्या विरोधात आमचा लढा असणार आहे," असं नाना पटोले म्हणाले. 

टॅग्स :विधानसभानाना पटोलेबबनराव लोणीकरभाजपा