बाळासाहेबांनंतर शिवसेनेत (उबाठा) शिवसैनिकांना अजिबात किंमत नाही - मीना कांबळी
By मनोहर कुंभेजकर | Published: October 18, 2023 10:26 PM2023-10-18T22:26:27+5:302023-10-18T22:27:06+5:30
एकनाथ शिंदे यांनी त्यांचे मनापासून स्वागत केले आणि शुभेच्छा दिल्या तसेच मीना कांबळी यांची शिवसेना नेते पदी नियुक्ती केली.
मुंबई-शिवसेना (उबाठा) गटाच्या उपनेत्या मीना कांबळी यांनी आज शेकडो कार्यकर्त्या सहित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात वर्षा निवासस्थानी जाहीर प्रवेश केला. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी त्यांचे मनापासून स्वागत केले आणि शुभेच्छा दिल्या तसेच मीना कांबळी यांची शिवसेना नेते पदी नियुक्ती केली. याप्रसंगी शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के, प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि चित्रपट सेना अध्यक्ष सुशांत शेलार देखील उपस्थित होते.
यावेळी बोलताना मीना कांबळी म्हणाल्या की, मी ४५ वर्षे बाळासाहेबांच्या आणि माँ साहेबांच्या सोबतीने काम करत असताना महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात महिला आघाडी मजबूत करण्यासाठी, महिलांवरील अत्याचार दूर करण्यासाठी काम केले. एक सामान्य शिवसैनिक म्हणून काम करत असताना गटप्रमुख, शाखाप्रमुख, विभागप्रमुख आणि नंतर शिवसेना उपनेतेपद बाळासाहेबांनी मला बहाल केले. पण इतके निष्ठेने इमाने-इतबारे काम करून सुद्धा बाळासाहेबांच्या नंतर माझ्या या कामाची किंमत केली गेली नाही. किंबहुना बाळासाहेबांनंतर शिवसेनेत (उबाठा) शिवसैनिकांना अजिबात किंमत मिळत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालील शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांना घेऊन चालणारी शिवसेना आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर प्रभावित होऊन आणि तळागाळातील लोकांसाठी काम करण्याची वृत्ती पाहून त्यांच्या शिवसेनेत प्रवेश करत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मीना कांबळी यांनी महिला आघाडी वाढविण्याचे काम संपूर्ण महाराष्ट्रात केले. शिवसेनेच्या सर्व आंदोलनांमध्ये व चळवळीमध्ये आग्रही भूमिका घेऊन त्यांनी शिवसेनेची संघटनात्मक बांधणी संपूर्ण महाराष्ट्रात केली. त्यांनी बाळासाहेब यांच्यासोबत काम केलेले आहे, त्यांच्या सोबत शिवसेनेमध्ये मी ही काम केले आहे. त्यांचे प्रत्येक काम, प्रत्येक आंदोलन हे दखल घेण्यासारखे असायचे. म्हणूनच माननीय बाळासाहेबांनी त्यांना रणरागिणी म्हणून संबोधलं होते. अशा मीना कांबळी पक्ष सोडून खऱ्या आणि बाळासाहेबांच्या सच्च्या शिवसेनेत येत आहेत. त्यांचे पक्षात खूप स्वागत आहे.
बाळासाहेबांची भूमिका आणि विचार हे राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशभरात न्यायचे आहेत, हे आपले एकमेव ध्येय आहे आणि त्या ध्येय्यासाठी आपण काम करत आहोत. एक टीम म्हणून आपल्याला काम करायचे आहे. एक टीम म्हणून काम केल्यावरच आपण चांगला रिझल्ट देऊ शकतो. मी देखील एक मुख्यमंत्री म्हणून नाही तर एक कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी आमच्या सरकारने देखील अनेक निर्णय घेतले आहेत. लेक लाडकी योजना, महिलांना एसटी प्रवासामध्ये ५०% सूट, एखाद्या इमारतीत फ्लॅट घेतल्यास रजिस्ट्रेशन फी वर १% सूट, महिला बचत गटासाठी योजना असे अनेक चांगले निर्णय आमच्या सरकारने घेतलेले आहेत. मीनाताईंची नेतेपदी नियुक्ती करण्यात मला अत्यंत आनंद होत आहे. भविष्यामध्ये महिला आघाडी सक्षम करण्यात त्यांच्या अनुभव कामी येईल.