Join us

२० साल बाद... एन्काऊंटर स्पेशालिस्ट 'दया नायक' पुन्हा मुंबई क्राईम ब्रांचमध्ये रुजू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2023 16:39 IST

दया नायक यांच्यासोबत पाच अन्य अधिकाऱ्यांनादेखील नवीन पोस्टिंग देण्यात आली आहे

एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून परिचीत असलेले पोलीस अधिकारी दया नायक आता पुन्हा पोलीस दलातील सेवेत रुजू झाले आहेत. यावेळी, त्यांना गुन्हे शाखेत जबाबदारी देण्यात आली आहे. तब्बल २ दशकानंतर दया नायक मुंबई क्राईम ब्रांचमध्ये रुजू झाले आहेत. मुंबईतील सर्वात प्राईम लोकेशन मानण्यात येणाऱ्या बांद्रा क्राईम ब्रांच येथे त्यांना पोस्टींग देण्यात आली आहे. मुंबईत अंडरवर्ल्डचा थरात असताना सन १९९९ ते २००३ या कालावधीत दया नायक यांनी मुंबईतील अधेरी येथे सीआययूमध्ये काम केले होते. 

दया नायक यांच्यासोबत पाच अन्य अधिकाऱ्यांनादेखील नवीन पोस्टिंग देण्यात आली आहे. मानखुर्द, मरीन ड्राईव्ह, कांदिवली आणि मुंबई वाहतूक पोलिसांमध्ये त्यांना पोस्टिंग दिली गेली आहे.महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकात तीन वर्ष पूर्ण केल्यानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेत नवी पोस्टिंग मिळाल्याची माहिती दया नायक यांनी ट्विटरवरुन दिली. 

तुम्हा सर्वांच्या आशा अपेक्षा पूर्ण करेन आणि माझ्या पूर्ण क्षमतेनं मुंबईची सेवा करेन, असं नायक यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. २८ मार्चला महाराष्ट्र एटीएसमधून दया नायक यांची मुंबई पोलिसात बदली झाली. मात्र त्यानंतर दोन महिने त्यांना पोस्टिंग मिळाली नव्हती. २८ मार्चपासूनच ते पोस्टिंगच्या प्रतीक्षेत होते. दया नायक जवळपास तीन वर्षे एटीएसमध्ये कार्यरत होते. २००३ मध्ये क्राईम ब्रांच सोडल्यानंतर आता २०२३ मध्ये ते क्राईम ब्रांचसाठी काम करणार आहेत. 

दया नायक यांनी तब्बल ८४ एन्काऊंटर केले असून आपल्या पोलीस सेवेत हजारांहून अधिक गुन्हेगारांना अटक केली आहे. राम गोपाल वर्मा यांच्या अब तक ५६ या सिनेमातील प्रमुख पात्रावरु नेहमीच वाद राहिला. हा चित्रपट दया नायक यांच्या कारकिर्दीवरच असल्याचं बोललं जातं. प्रदीप शर्मा जे दया नायकचे कधीकाळी बॉस होते, त्यांनीही या चित्रपटाबद्दल असंच विधान केलं होतं. 

दरम्यान, सचिन वाझे आणि अँटिलीया प्रकरणावरुन मुंबई क्राईम ब्रांच गेल्या काही दिवसांपासून चांगलंच चर्चेत होतं. वाझेमुळे क्राईम ब्रांचची प्रतिमा डागाळली होती. त्यानंतर, येथे अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्याही करण्यात आल्या. आता, पुन्हा एकदा मुंबई क्राईम ब्रांचमध्ये जुन्या व अनुभवी अधिकाऱ्यांना पोस्टींग दिली जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

टॅग्स :मुंबईगुन्हेगारीपोलिस