परमबीर सिंग यांनी मोहन भागवतांना अटक करण्याचे आदेश दिले होते!; कुणी केला खळबळजनक दावा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 10:07 IST2025-03-21T10:03:41+5:302025-03-21T10:07:38+5:30

Malegaon Blast Case: मालेगाव बॉम्बस्फोटाशी माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचे कनेक्शन उघड झाल्याचा दावा केला जात आहे.

advocate ranjeet sangle big claims in nia court malegaon blast case hearing that param bir singh ordered to arrest rss chief mohan bhagwat to ats | परमबीर सिंग यांनी मोहन भागवतांना अटक करण्याचे आदेश दिले होते!; कुणी केला खळबळजनक दावा?

परमबीर सिंग यांनी मोहन भागवतांना अटक करण्याचे आदेश दिले होते!; कुणी केला खळबळजनक दावा?

Malegaon Blast Case: बीड, परभणी प्रकरणावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले होते. महायुती सरकारला घेरण्याचा जोरदार प्रयत्न केला. यानंतर औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा पुढे आला. नागपूर येथे मोठा हिंसाचार झाला. यावरूनही विरोधकांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला. यानंतर दिशा सालियान मृत्यू प्रकरणावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहे. यातच आता नवीन मुद्दा राजकीय वर्तुळाचा केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता आहे. परमबीर सिंग यांनी मोहन भागवत यांना अटक करण्याचे आदेश दिले होते, असा मोठा खळबळजनक दावा करण्यात आला आहे. 

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाची विशेष एनआयए न्यायालयात अंतिम सुनावणी सुरू आहे. या प्रकरणातील याचिकेच्या सुनावणीदरम्यान युक्तिवाद करताना यातील संशयित सुधाकर द्विवेदी यांच्या वतीने वकील रणजित सांगळे यांनी बाजू मांडताना सदर दावा केला आहे. माजी एटीएस अधिकारी मुजावर यांनी आधीच मीडियाला माहिती देताना सांगितले की, संदीप डांगे आणि रामचंद्र कलसांग्रा एटीएसच्या कोठडीत मृत्यू पावले होते. परंतु, विशेष एनआयए न्यायालयात दाखल केलेल्या एटीएसच्या आरोपपत्रात त्या दोघांना जिवंत दाखवण्यात आले असून, एटीएसला ते हवे आहेत, असा युक्तिवाद वकील सांगळे यांनी न्यायालयात केल्याची माहिती देण्यात आली आहे.

परमबीर सिंग यांनी मोहन भागवतांना अटक करण्याचे आदेश दिले होते

वकील सांगळे यांनी न्यायालयाला सांगितले की, तत्कालीन एटीएस अधिकारी मेहबूब मुजावर यांना परमबीर सिंग यांनी बोलावले. नागपूरला जाऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच RSS प्रमुख मोहन भागवत यांना उचलण्याचे आणि मुंबईला घेऊन येण्याचे आदेश दिले होते. परंतु, हे आदेश तोंडी असल्याने त्यांनी त्याचे पालन केले नाही. परिणामी  मुजावर यांना सोलापुरातील एका खोट्या प्रकरणात गोवण्यात आले. माजी एटीएस अधिकारी मुजावर यांनी सोलापूर न्यायालयात दिलेल्या जबाबात ही माहिती उघडकीस आली असून, मालेगाव बॉम्बस्फोटाचा तपास खोटा व हिंदू दहशतवादाचे खोटे कथानक पसरवण्यासाठीच होता, असा दावाही वकील सांगळे यांनी आपल्या युक्तिवादात केल्याचे सांगितले जात आहे. 

दरम्यान, मालेगाव बॉम्बस्फोटाशी माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचे कनेक्शन उघड झाले आहे, असे समजते. मालेगाव येथे २९ सप्टेंबर २००८ रोजी मशिदीजवळ मोटारसायकलवर बॉम्बस्फोट होऊन अनेक जण ठार, तर १०० हून अधिक नागरिक जखमी झाले होते. या प्रकरणात आता नवनवीन खुलासे होत असून, राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परमबीर सिंग यांनी यापूर्वी अनेक दावे केले होते.

 

Web Title: advocate ranjeet sangle big claims in nia court malegaon blast case hearing that param bir singh ordered to arrest rss chief mohan bhagwat to ats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.