जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 13:55 IST2025-09-29T13:47:56+5:302025-09-29T13:55:09+5:30
अखेर १५ वर्षाच्या अथक शोधानंतर नताशाला यश आले. ३८ व्या वर्षी तिला लॉजिस्टिक्स विशेषज्ञाकडून तिच्या आईचा पत्ता सापडला.

जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
मुंबई - स्वित्झर्लंडच्या ज्यूरिख इथं राहणाऱ्या नताशाकडे सर्वकाही आहे. प्रेम, काळजी घेणारं कुटुंब, चांगले जीवन, करिअर आणि चांगले भवितव्य परंतु एका गोष्टीची कमी तिच्या मनात कायम होती. तिला तिच्या आई वडिलांनी खूप प्रेम दिले परंतु नताशाला एकदा तरी तिला जन्म दिलेल्या आईला भेटायचे होते. नताशाच्या जन्मानंतर तिच्या आईने तिला सोडून दिले होते. एका अनाथाश्रमातून जोडप्याने तिला दत्तक घेऊन परदेशात घेऊन गेले. वयाच्या २२ व्या वर्षी तिला खरे सत्य कळले, तेव्हापासून तिने खऱ्या आईचा शोध सुरू केला. सोशल मिडियात शोधले, संघटनांशी संपर्क केला. तिच्या जन्मापासून ते दत्तक घेण्याची सर्व कागदपत्रे छाननी केली. न हरता ती आईचा शोध घेतच राहिली.
अखेर १५ वर्षाच्या अथक शोधानंतर नताशाला यश आले. ३८ व्या वर्षी तिला लॉजिस्टिक्स विशेषज्ञाकडून तिच्या आईचा पत्ता सापडला. नताशाचा जन्म १९८७ साली झाला होता. ती केवळ ११ दिवसांची होती जेव्हा तिला आईने अनाथाश्रमात सोडले होते. १ वर्षाची झाल्यानंतर तिला परदेशी जोडप्याने दत्तक घेतले. ती ज्यूरिख येथे लहानाची मोठी झाली. शालेय जीवन, मित्र परिवार तिथेच तयार झाला. परंतु तिच्या रंगावरून तिचे वेगळेपण लगेच दिसून येत होते. जसजसं ती मोठी होऊ लागली लोकांकडून तिला टोमणे ऐकायला आले. त्यानंतर तिला खरी कहाणी कळली.
खऱ्या आईचा शोध घेण्यासाठी ती तयार झाली. परंतु ज्या कुटुंबाने तिला घर दिले, चांगले आयुष्य दिले त्यांनाही ती दुखवू इच्छित नव्हती. नताशाच्या मनातील घाळमेळ तिच्या दत्तक आई वडिलांना जाणवली. त्यानंतर तिच्या आईने तिला साथ दिली, तिला सर्वकाही सांगितले. तिला दत्तक घेतलेली कागदपत्रे सापडली. मग नताशाने आईचा शोध सुरू केला. ज्या मुंबईतील अनाथाश्रमातून तिला दत्तक दिले गेले, तिथून कुठलीही माहिती देण्यास नकार दिला. अचानक जून २०२५ मध्ये तिला एक ईमेल आला आणि सर्वकाही बदलले. २३ सप्टेंबरला नताशा मुंबईत तिच्या खऱ्या आईला भेटायला आली. हा क्षण तिला शब्दात सांगता येणे कठीण होता.
नताशा आणि तिच्या खऱ्या आईची ही भेट केवळ ३० मिनिटांची होती. कारण ती तिच्या पती आणि मुलापासून लपवून भेटायला आली होती. नताशाच्या जन्मावेळी तिची आई केवळ १५ वर्षाची होती. एका मुलासोबत तिचे अफेअर सुरू होते. ज्यातून ती गर्भवती झाली. समाजाच्या भीतीने तिने नताशाला सोडून दिले. कुटुंबापासून ही गोष्ट लपवून ठेवली. नताशाने आईला पाहिले तेव्हा तिचे डोळे, नाक, चेहरा तिच्यासारखाच दिसत होता. माझे डोळे कायम रागात असतात असं लोक म्हणायचे, परंतु जेव्हा मी माझ्या आईला भेटले तेव्हा ते खरेच वाटले. मला माझ्या आईने का सोडले हेच मला जाणून घ्यायचे होते. अफेअरमधून मी जन्माला आले, त्यामुळे मला आईने सोडले. ती परिस्थिती काय असेल याची कल्पना मी केली असं सांगत माझ्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली असं नताशाने एका मुलाखतीत सांगितले.