एमबीबीएससाठी प्रवेश प्रक्रिया सुरू, २२ ऑक्टोबरपर्यंत करता येणार अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2022 07:51 AM2022-10-19T07:51:26+5:302022-10-19T07:51:42+5:30

२८ तारखेला पहिल्या फेरीची यादी. 

Admission process for MBBS starts applications can be made till 22nd October know details and be alert | एमबीबीएससाठी प्रवेश प्रक्रिया सुरू, २२ ऑक्टोबरपर्यंत करता येणार अर्ज

एमबीबीएससाठी प्रवेश प्रक्रिया सुरू, २२ ऑक्टोबरपर्यंत करता येणार अर्ज

googlenewsNext

मुंबई : राज्यातील सरकारी, अनुदानित, खासगी विनाअनुदानित, अल्पसंख्याक संस्थामधील एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस अशा आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. २२ ऑक्टोबरपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज भरता येणार आहे. एमबीबीएस, बीडीएससह अन्य काही अभ्यासक्रमांच्या पहिल्या फेरीची निवड यादी २८ ऑक्टोबरला जाहीर होणार आहे.

वैद्यकीय अभ्यासक्रमाची प्रवेश ‘नीट यूजी २०२२’ची परीक्षा १७ जुलैला झाली आणि या परीक्षेचा निकाल ७ सप्टेंबरला जाहीर झाला. त्यानंतर जवळपास दीड महिन्यानंतर वैद्यकीय अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया जाहीर झाली. या प्रवेश प्रक्रियेंतर्गत राज्यातील सरकारी, अनुदानित, महापालिका, खासगी विनाअनुदानित आणि अल्पसंख्याक संस्थांमध्ये आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची प्रक्रिया राज्य सरकारच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) नुकतीच जाहीर केली आहे. देशपातळीवरील रँकमधील विद्यार्थी ऑनलाइन नावनोंदणी करू शकतील.

एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस, बीपीटीएच, बीओटीएच, बीएएसएलपी, बी (पी अँड ओ), बीएस्सी नर्सिंग अशा अभ्यासक्रमांसाठी या अंतर्गत नोंदणी करता येणार आहे. ऑनलाइन नोंदणी नसल्यास विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत सहभागी करून घेणार नसल्याचे परीक्षा कक्षातर्फे सांगण्यात आले. जाहीर केलेल्या वेळापत्रकात केंद्र व राज्य सरकार, न्यायालय, एमसीसी, एएसीसीसी यांच्या सूचनांनुसार बदल होऊ शकतो, असेही या कक्षाने अधोरेखित केले आहे.

आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे वेळापत्रक :

  • ऑनलाइन नोंदणी (सर्व अभ्यासक्रमांसाठी) : २२ ऑक्टोबरपर्यंत
  • नोंदणी शुल्क भरणे (ऑनलाइनच्या साह्याने) :  २३ ऑक्टोबरपर्यंत
  • प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे :  २४ ऑक्टोबरपर्यंत (सायंकाळी पाच वाजेपर्यंत
  • उपलब्ध जागांचा तपशील जाहीर करणे (ग्रुप ए - एमबीबीएस, बीडीएस. ग्रुप सी- बीपीटीएच, बीओटीएच, बीएएसएलपी, बीपी अँड ओ, बी.एस्सी (नर्सिंग) : २० ऑक्टोबर
  • ऑनलाइन अर्जात प्राध्यान्यक्रम देणे (ग्रुप ए आणि ग्रुप सी) : २१ ते २७ ऑक्टोबर
  • तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर करणे : २५ ऑक्टोबर
  • पहिल्या फेरीसाठी विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर करणे : २८ ऑक्टोबर 
  • प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करणे : २९ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर
  • विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी हे संकेतस्थळ : https://cetcell. mahacet.org


सावधानता बाळगा 
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी, अर्ज भरणे, नोंदणी शुल्क भरणे ही प्रक्रिया एजंट किंवा सायबर कॅफेमार्फत करत असाल, तर सावध राहा. संबंधित एजंट, सायबर कॅफेतील व्यक्ती ऑनलाइन अर्ज भरण्यास किंवा शुल्क भरण्यास अयशस्वी झाल्यास, वेळेत अर्ज भरणे, शुल्क भरणे शक्य न झाल्यास विद्यार्थी जबाबदार असेल. अशा विद्यार्थ्यांनी मुदत संपल्यानंतर विनंती केली, तरीही त्याची दखल घेतली जाणार नाही, असे सीईटी सेलने स्पष्ट केले आहे.

Web Title: Admission process for MBBS starts applications can be made till 22nd October know details and be alert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :doctorडॉक्टर