Join us

"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 00:01 IST

विजयी मेळाव्यावर सत्ताधाऱ्यांनी टीका केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Aaditya Thackeray on Sanjay Gaikwad: हिंदी शिकवण्याच्या निर्णय आणि त्रिभाषा सूत्र लागू करण्याचा शासन निर्णय सरकारने मागे घेतल्यानंतर शनिवारी ठाकरे बंधूंचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे २० वर्षांनी एकाच मंचावर आले होते. त्यामुळे या मेळाव्याची जोरदार चर्चा झाली. दुसरीकडे ठाकरेंच्या भेटींवरुन सत्ताधाऱ्यांकडून टीका देखील करण्यात आली. अशातच शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी ठाकरे ब्रँडचा उल्लेख करत धक्कादायक विधान केलं होतं. त्याच विधानावरुन आता ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

शनिवारी झालेल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यानंतर सत्ताधाऱ्यांकडून उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र डागलं जात आहे. विजयी मेळाव्यानंतर शिंदे गटाकडून उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करण्यात आले. शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी ठाकरे नावाचा ब्रँड असता बाळासाहेब ठाकरे जिवंत असतानाच २८८ जागा निवडून आले असते असं विधान केलं. त्यावर प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे यांनी त्यांचे पक्षप्रमुख कारवाई करणार की नाही हे पाहणार असल्याचे म्हटलं.

"संजय गायकवाड यांच्यावर त्यांच्या पक्षाचे तथाकथित पक्षप्रमुख कारवाई करणार की नाही हे महाराष्ट्र पाहणार आहे. राग तर येतो आहे पण जे कारवाई करु शकतात ते कारवाई करणार आहेत की सत्तेत राहण्यासाठी असेच सगळं चालू देणार आहेत," असं आदित्य ठाकरे म्हणाले.

"हे सरकार निवडणूक आयोगाचे असल्यामुळे यांना महाराष्ट्राच्या जनतेची पडलेली नाही. महाराष्ट्र एकत्र येतोय त्यामुळे महाराष्ट्र द्वेष्टे भाजपच्य लोकांच्या पोटात दुखत आहेत. जे महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू इच्छित आहेत त्यांच्या पोटात तर दुखणारच आहे. पण काल महाराष्ट्र आणि मराठी प्रेमी लोकांची ताकद आपण पाहिली," असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

यावेळी आदित्य ठाकरेंनी मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पत्रावरही भाष्य केलं. "ही सगळी नौटंकी आहे. फोन करुन सुद्धा बोलू शकतात. पत्र लिहीण्याची काय गरज? तुमच्यामध्ये संवाद नाही का. त्यांच्यात किती भांडणे आहेत ही मला माहिती आहेत. त्यांची भांडणे मी सोडवायचो. दोघेही फोनवर रडायचे. ते एकमेकांच्या किती विरोधात आहेत हे मला माहिती आहे," असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं.  

टॅग्स :आदित्य ठाकरेएकनाथ शिंदेसंजय गायकवाड