आमचं सरकार असतं तर...; कोस्टल रोडला तडे जाताच आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 16:39 IST2025-02-21T16:37:48+5:302025-02-21T16:39:30+5:30
आदित्य ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

आमचं सरकार असतं तर...; कोस्टल रोडला तडे जाताच आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल
Aditya Thackeray: राजधानी मुंबईत तब्बल १४ हजार कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या कोस्टल रोडला तडे गेल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर प्रशासनाने या रोडवरील तडे डांबरानं भरल्याचंही स्पष्ट झालं. काँक्रिटच्या रस्त्यावर ठिकठिकाणी डांबराचे पॅच लावण्यात आले आहेत. यावरुन महानगरपालिका आणि पर्यायानं सरकारवर टीका होऊ लागली आहे. तसंच या बाबीची दखल थेट पंतप्रधान कार्यालयाकडून घेण्यात आली असून पंतप्रधान कार्यालयानं राज्याच्या मुख्य सचिवांकडून माहिती मागवली. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले की, "आम्ही आधीच म्हटलं होतं, मिंधे जिथे जिथे हात लावतात तिथे तिथे कामं रखडतात, खर्च वाढतात आणि कामाची मात्र वाट लागते. मिंधे व त्यांचे लाडके कंत्राटदार केवळ ‘रस्त्यावरचा मलिदा‘ खाण्यात पटाईत आहेत. कोस्टल रोडवर 'हाजीअली ते वरळीपर्यंतच्या' रस्त्यावर केलेलं पॅचवर्क हे त्याचंच ढळढळीत उदाहरण," असा हल्लाबोल आदित्य यांनी केला आहे.
दरम्यान, "आमचं सरकार असतं तर उत्तम गुणवत्तेचा कोस्टल रोड २०२३ मध्येच संपूर्ण तयार झालेला असता आणि आजवर सायकल ट्रॅक्स, बागा तयार होऊन नागरिकांसाठी खुल्या झालेल्या असत्या," असा दावाही यावेळी आदित्य ठाकरेंनी केला.
आम्ही आधीच म्हटलं होतं, मिंधे जिथे जिथे हात लावतात तिथे तिथे कामं रखडतात, खर्च वाढतात आणि कामाची मात्र वाट लागते... मिंधे व त्यांचे लाडके कंत्राटदार केवळ ‘रस्त्यावरचा मलिदा‘ खाण्यात पटाईत आहेत....
— Aaditya Thackeray (@AUThackeray) February 21, 2025
कोस्टल रोडवर 'हाजीअली ते वरळीपर्यंतच्या' रस्त्यावर केलेलं पॅचवर्क हे त्याचंच…
महापालिकेचं स्पष्टीकरण
"सागरी किनारा मार्गावरील (कोस्टल रोड) उत्तर दिशेने जाणारा मार्ग जुलै २०२४ मध्ये वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. पावसाळ्याआधी या भागातील पुलाच्या सांध्यांना तडे जाऊ नयेत, यासाठी डांबरीकरण करण्यात आले होते. ते मजबूत राहावे यासाठी त्यावर मस्टिकचे अतिरिक्त आवरण ठिकठिकाणी टाकण्यात आले होते. हे डांबरीकरण हटवून रस्ता समतोल केला जाईल," असं स्पष्टीकरण महापालिका प्रशासनाकडून देण्यात आलं आहे.