Join us
Daily Top 2Weekly Top 5

आदेश भावोजींवर भ्रष्टाचाराचे आरोप, मनसेनं दाखवली सिद्धीविनायक ट्रस्टची डायरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2022 11:37 IST

मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरात घोटाळा झाल्याचा आरोप केला

मुंबई - शिवसेनेत मोठी फूट पडल्यानंतर शिंदे गट विरुद्ध ठाकरेंची शिवसेना असा सामना रंगला आहे. त्यातच, सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरेंना लक्ष्य केलं आहे. शिवसेनेच्या संजय राऊतांवरही शिंदे गटाकडून निशाणा साधण्यात येत आहे. आता, शिवसेनेचे आणखी एक नेते आणि सिद्धीविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांच्यावर भ्रष्ट्राचाराचे आरोप करण्यात आले आहेत. मनसेचे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी डायरी छपाईचा मुद्दा उपस्थित करत, हा घ्या डायरीचा पुरावा... म्हणत काही कागदपत्रेच शेअर केली आहेत. त्यामुळे, बांदेकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. 

मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरात घोटाळा झाल्याचा आरोप केला. त्यानंतर आता मनसे (MNS) नेते मनोज चव्हाण यांनींही आदेश बांदेकरांवर नवा आरोप केला आहे. सिद्धिविनायक न्यास मंदिराकडून दरवर्षी दैनंदिनी डायरी काढली जाते. परंतु या वर्षी ती काढण्यात आलेली नाही. या डायरीवर आदेश बांदेकरांना उद्धव ठाकरे यांचा फोटो हवा, आहे असा आरोप मनोज चव्हाणांनी केला. तसेच, याप्रकरणी आदेश बांदेकर यांनी खर्च टाळण्यासाठी यंदा डायरी छापली नाही, असे उत्तर दिले. त्यावर, मग डायरीची निविदा का काढली? असे म्हणत चव्हाण यांनी काही फोटो ट्विटरवरुन शेअर केले आहेत. 

आदेश बांदेकराचा खोटारडेपणा बघा - चव्हाण

माध्यम प्रतिनिधींना माहीती सांगतायत की खर्च टाळण्यासाठी दैनंदिन डायरी छापली नाही मग निविदा का काढली ? इतकी गडबड करून निवादा खुली सुद्धा केली आणि हे काम स्नेहा प्रिन्ट्स सर्व्हिसला दिले. इतके होऊन सुद्धा फक्त उद्धव ठाकरे यांच्या फोटोसाठी या माणसान डायरी प्रिंटींग थांबवून ठेवली आहे. या खोटारड्या माणसाला या पवित्र देवस्थानाच्या मंडळ अध्यक्ष पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. आदेश बांदेकरांचा खोटारडेपण बघा... असेही मनोज चव्हाण यांनी म्हटलं आहे. तसेच, यावर बांदेकरांनी उलट प्रतिक्रिया द्यावीच मी याबाबतीत अजुन कागदपत्रे जाहीर करतो. फोटोसाठी या  माणसाने डायरी प्रिंटींग थांबवून ठेवली आहे. यावर बांदेकरांनी उलट प्रतिक्रिया द्यावीच मी याबाबतीत अजुन कागदपत्रे जाहीर करतो राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोला इतका विरोध किती ही नीच मानसिकत. असे ट्विटही मनोज चव्हाण यांनी केले आहे.    

टॅग्स :आदेश बांदेकरमनसेमुंबईभ्रष्टाचारउद्धव ठाकरे