पोलीस आयुक्तांकडे पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त पदभार, खात्ययात मोठ्या घडामोडी होण्याचे संकेत
By मनीषा म्हात्रे | Updated: December 31, 2023 18:36 IST2023-12-31T18:36:17+5:302023-12-31T18:36:53+5:30
Mumbai Police Update: राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ हे वयोमानानुसार रविवारी सेवानिवृत्त झाले. पोलीस महासंचालक कोण होणार? याकडे लक्ष लागले असताना पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे.

पोलीस आयुक्तांकडे पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त पदभार, खात्ययात मोठ्या घडामोडी होण्याचे संकेत
मुंबई - राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ हे वयोमानानुसार रविवारी सेवानिवृत्त झाले. पोलीस महासंचालक कोण होणार? याकडे लक्ष लागले असताना पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे. रविवारी गृहविभागाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लवकरच पोलीस दलात मोठ्या घडामोडी होणार असल्याचे समजते.
राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ ३१ डिसेंबरला सेवानिवृत्त झाले. सेठ यांची राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी यापूर्वीच नियुक्ती झाली आहे. राज्याच्या महासंचालक पदासाठी सेवा ज्येष्ठतेनुसार रश्मी शुक्ला, संदीप बिष्णोई, विवेक फणसळकर, प्रज्ञा सरवदे, जयजित सिंह आणि सदानंद दाते यांचे प्रस्ताव सरकारने केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे पाठविले आहेत. नियमानुसार राज्याच्या महासंचालकपदासाठी किमान सहा महिन्यांपेक्षा अधिक सेवाकाळ शिल्लक असणारा अधिकारी पात्र ठरतो. यातील बिष्णोई आणि सिंह एप्रिलमध्ये सेवानिवृत्त होत असून शुक्ला या जूनमध्ये सेवानिवृत्त होणार आहेत. मुंबईचे पोलीस आयुक्त फणसळकर यांची महासंचालकपदी आणि त्यांच्या जागी शुल्का यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
रविवारी गृह विभागाने फणसळकर यांच्याकडे पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त भार सोपवला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत काय घडामोडी घडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.