बेस्ट सुसाट! पर्यावरणपूरक २००० गाड्यांची भर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2024 09:59 AM2024-02-03T09:59:15+5:302024-02-03T10:04:12+5:30

बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात नवीन बसगाड्याही मुंबईकरांना उपलब्ध होणार आहेत.

Addition of 2000 eco friendly buses increase in mumbai best | बेस्ट सुसाट! पर्यावरणपूरक २००० गाड्यांची भर

बेस्ट सुसाट! पर्यावरणपूरक २००० गाड्यांची भर

सीमा महांगडे, मुंबई : बेस्ट उपक्रमाची आर्थिक परिस्थिती विचारात
घेऊन २०२४-२५ च्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये बेस्ट उपक्रमाला पालिकेकडून ९२८.६५ कोटी रुपये आर्थिक साहाय्य देण्याची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे मार्च २०२५ पर्यंत बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात नवीन बसगाड्याही मुंबईकरांना उपलब्ध होऊन त्यांचा प्रवास अधिक आरामदायी आणि सुसाट होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबई शहरासाठी बेस्ट उपक्रमाच्या २००० इलेक्ट्रिक बसगाड्या उपलब्ध करून देण्यासाठी एकूण २५७३ कोटी इतका खर्च येणार आहे. यासाठी जागतिक बँक आणि राज्य शासनाकडून अनुक्रमे ७० टक्के व २५ टक्के रक्कम बेस्ट उपक्रमास देण्यात येणार आहे. उर्वरित ५ टक्के हिस्सा म्हणजेच १२८.६५ कोटी इतकी रक्कम पालिकेने देण्याबाबत राज्य शासनाने कळवले आहे. त्या पार्श्वभूमीवर २०२४-२५ च्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये बेस्ट उपक्रमास अतिरिक्त अनुदान म्हणून १२८.६५ कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे.

८०० कोटी कशासाठी?

बेस्ट उपक्रमास पायाभूत विकास आणि भांडवली उपकरणे खरेदी, कर्जाची परतफेड भाडेतत्त्वावरील नवीन बसेस येणे, वेतन करारान्वये येणारे आर्थिक दायित्व, आयटीएमएस प्रकल्प, निवृत कर्मचाऱ्यांचे उपदान व इतर विविध देणी देणे, विद्युत देणी अदा करणे, इत्यादीकरिता २०२४-२५ च्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये बेस्ट उपक्रमास अनुदान म्हणून ८०० कोटी इतकी तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.

ताफ्यात वाढ होणार :

बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात एकेकाळी पाच हजार बसेस आणि ४५ लाख प्रवासी होते. परंतु बेस्ट उपक्रमावर वक्रदृष्टी पडली आणि बेस्टला उतरती कळा लागली, सद्यस्थितीत बेस्ट उपक्रमाकडे २,९४१ बसेस असल्या, तरी यापैकी स्वमालकीच्या १,१६४, भाडेतत्त्वावरील-१,७७७ अशा एकूण २९४१ बसेस आहेत. तर प्रवासी संख्या ३५ लाख आहे. अनुदानानंतर लवकरच या ताफ्यात पुन्हा वाढ होऊन प्रवास सुखकर होईल, अशी अपेक्षा आहे.

Web Title: Addition of 2000 eco friendly buses increase in mumbai best

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.