Dharavi: धारावीत शौचालय सुविधांचा गंभीर पेच; ८६ पुरुषांमागे तर ८१ महिलांमागे केवळ 'एक' टॉयलेट सीट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 14:25 IST2025-11-19T14:24:33+5:302025-11-19T14:25:34+5:30
Dharavi News: स्वच्छ आणि सुरक्षित शौचालये हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असूनही, त्याकरिता मोठ्या प्रमाणावर नागरिकांना झगडावे लागत आहे.

Dharavi: धारावीत शौचालय सुविधांचा गंभीर पेच; ८६ पुरुषांमागे तर ८१ महिलांमागे केवळ 'एक' टॉयलेट सीट
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: स्वच्छ आणि सुरक्षित शौचालये हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असूनही, त्याकरिता मोठ्या प्रमाणावर नागरिकांना झगडावे लागत आहे. धारावीही त्याला अपवाद नाही. तेथील वस्त्यांमध्ये ८६ पुरुषांमागे एक शौचकूप (टॉयलेट सीट) असे प्रमाण आहे. महिलांच्या बाबतीत प्रमाण ८१ महिलांमागे केवळ टॉयलेट सीट, असे आहे. त्याचबरोबर गोवंडी, मानखुर्द, मालाड-मालवणी, कुर्ला येथील झोपडपट्ट्यांतही असेच चित्र आहे.
स्वच्छ भारत मिशनच्या निकषांनुसार, शहरी भागात ३५ पुरुषांसाठी एक टॉयलेट सीट, तर २५ महिलांसाठी एक टॉयलेट सीट आवश्यक आहे. प्रजा फाउंडेशनच्या अहवालानुसार, झोपडपट्ट्यांमधील शौचालयांची आकडेवारी धक्कादायक आहे. धारावीसारख्या वस्त्यांमध्ये ८६ पुरुषांसाठी केवळ एक तर महिलांच्या बाबतीत हे प्रमाण ८१ महिलांना एक सीट, असे आहे. चिंताजनक बाब म्हणजे बहुतांशी शौचालये मध्यरात्री १२ ते पहाटे ५ पर्यंत बंद असतात. त्यामुळे महिलांची कुचंबणा होते. धारावीतील ७० टक्के रहिवासी सार्वजनिक शौचालयांवर अवलंबून आहेत. तेथील रहिवासी मीना देवी यांनी सांगितले, नैसर्गिक विधीसाठी मुलींना रात्री बाहेर पडावे लागल्यास रस्त्यांवरील वादविवाद, असुरक्षित वातावरणामुळे अडचणींचा सामना करावा लागतो.
कांचन मोरे यांच्या म्हणण्यानुसार, मुले मोठी झाली आहेत. त्यांना रात्री बाहेर जाऊन शौचालय वापरावे लागते. सार्वजनिक शौचालय वापरत असल्याने त्यांना मूत्रमार्गातील संसर्ग होतो. चाँद बेगम म्हणाल्या की, सार्वजनिक शौचालय स्वच्छ नसते तरीही तीन रुपये आकारले जातात. आमच्या तक्रारीकडे कोणीही लक्ष देत नाही.
मानखुर्द, गोवंडीसारख्या भागातही शौचालयांची अवस्था वाईट आहे. ‘वॉटर, गटर, मीटर’च्या नावाखाली काम करणारी पालिका किंवा लोकप्रतिनिधी यांनी गेल्या काही वर्षांत काय केले? हा प्रश्नच आहे. फय्याज आलम शेख, गोवंडी
पश्चिम उपनगरातही फार काही वेगळी परिस्थिती नाही. ज्या चाळींत किंवा झोपडपट्ट्यांत सार्वजनिक शौचालये आहेत. त्यांना कायमच अस्वच्छतेचा त्रास होतो. अरुण स्वामी, अंधेरी
अस्वच्छ शौचालयांमुळे मळमळ, उलट्या होऊ शकतात. डासांमुळे मलेरिया होण्याची भीती असते. दुर्गंधीमुळे श्वसनसंस्थेवर परिणाम होण्याचा धोका असतो. डॉ. मधुकर गायकवाड, सहयोगी प्राध्यापक, जे.जे. रुग्णालय
पालिकेची शौचालये अस्वच्छ आहेत. स्वच्छता कामगार कमी झाल्यामुळे ही दुरवस्था होत आहे. अनेकदा तेथे वीज व पाणीही नसते. दिलीप गाडेकर, धारावी