Join us  

...तर तुम्ही मुंबईबद्दल असं ट्विट केलं नसतं; रेणुका शहाणेंनी अमृता फडणवीसांचा घेतला समाचार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2020 2:44 PM

अमृता फडणवीस यांनी सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण ज्या पद्धतीने हाताळलं जात आहे, त्यावरून मुंबईने माणुसकीच गमावलीय असं वाटतं असल्याचं म्हटलं होतं.

मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलीस तपास करत आहेत. मात्र अधिक तपास करण्यासाठी बिहार पोलीसही मुंबईत दाखल झाले आहे. बिहारच्या आयपीएस अधिकाऱ्यांना मुंबईत क्वारंटाईन केल्यानंतर या प्रकरणावरून राजकारण तापलं आहे. बिहार पोलिसांना क्वारंटाईन केल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी राज्य सरकारसह मुंबई पोलिसांवर टीका केली होती. 

अमृता फडणवीस यांनी सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण ज्या पद्धतीने हाताळलं जात आहे, त्यावरून मुंबईने माणुसकीच गमावलीय असं वाटतं असल्याचं म्हटलं होतं. "सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा ज्या तऱ्हेने तपास सुरू आहे, त्यावरून मुंबईने माणुसकी गमावलीय असं मला वाटत आहे. निर्दोष आणि स्वाभिमानी नागरिकांसाठी आता मुंबईत राहणं अजिबात सुरक्षित नाही" असं अमृता फडणवीस यांनी सोमवारी ट्विट करुन म्हटलं होतं. अमृता फडणवीस यांच्या या विधानानंतर अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी निशाणा साधला आहे.

अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी अमृता फडणवीस यांच्या ट्वीटचा समाचार घेत चांगलेच फटकारले आहे. रेणुका शहाणे म्हणाल्या की, सुशांतच्या मृत्यूचे राजकारण करु नये. जर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अशी घटना घडली असती तर तेव्हा तुम्ही मुंबईबद्दल असं ट्वीट केलं नसतं, असा टोला रेणुका शहाणे यांनी अमृता फडणवीस यांना लगावला आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची निपक्षपणे चौकशी झाली पाहिजे, या प्रकरणावर मीडिया आणि राजकारण्यांचा कोणताही दबाव असता कामा नये, असं मत रेणुका शहाणे यांनी व्यक्त केले आहे.

रेणुका शहाणे यांनी अमृता फडणवीस यांना देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीकाळाची आठवण करून दिली आहे. शहाणे विचारतात की, फडणवीस सरकारच्या काळात एलफिस्टन पूल कोसळला यामध्ये असंख्य लोकांचा मृत्यू झाला. तेव्हा अमृता फडणवीस यांना मुंबईत असुरक्षित वाटलं नाही का, असा सवालही रेणुका शहाणे यांनी उपस्थित केला आहे.

आपल्या ट्विटर अकाऊंटवरून अमृता यांनी सोमवारी (3 ऑगस्ट) हे ट्विट केलं होतं. यासोबतच त्यांनी JusticeforSushantSingRajput आणि JusticeForDishaSalian असे दोन हॅशटॅग देखील वापरले आहेत. बिहारच्या अधिकाऱ्यांना क्वारंटाईन केल्यानंतर अनेकांनी पालिका आणि पोलिसांवर निशाणा साधत जोरदार टीका केली होती. मात्र दूसऱ्या राज्यातून आल्याने राज्य सरकारच्या नियमानूसार बिहारच्या IPS अधिकाऱ्यांना क्वारंटाईन केल्याचं मुंबई महापालिकेने स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :अमृता फडणवीसरेणुका शहाणेसुशांत सिंग रजपूतमुंबई पोलीसमहाराष्ट्र सरकारदेवेंद्र फडणवीस