तत्काळ तक्रारीमुळे अभिनेत्याला ९८ हजार रुपये मिळाले परत; ड्रायफ्रूट्सची बनावट जाहिरातीद्वारे फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 12:49 IST2025-12-20T12:48:55+5:302025-12-20T12:49:36+5:30
ओशिवरा पोलिसांचा उल्लेखनिय तपास

तत्काळ तक्रारीमुळे अभिनेत्याला ९८ हजार रुपये मिळाले परत; ड्रायफ्रूट्सची बनावट जाहिरातीद्वारे फसवणूक
मुंबई : फेसबुकवरील बनावट डी-मार्ट जाहिरातीद्वारे ऑनलाइन फसवणूक झालेले ज्येष्ठ अभिनेते गजेंद्र चौहान (६९) यांची ९८ हजार रुपयांची संपूर्ण रक्कम ओशिवरा पोलिस ठाण्याच्या सायबर सेलने 'गोल्डन अवर'मध्ये परत मिळवून दिली. त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान टळले आहे.
अंधेरी पश्चिमेतील लोखंडवाला -ओशिवरा परिसरात राहणाऱ्या चौहान यांना १० डिसेंबरला फेसबुकवर डी मार्टमध्ये ड्रायफ्रूट्स स्वस्तात उपलब्ध असल्याची जाहिरात दिसली. त्यातील ऑर्डरच्या लिंकवर क्लिक करताच मोबाइलवर ओटीपी आला. तो टाकल्यानंतर काही वेळातच त्यांच्या बँक खात्यातून ९८ हजार रुपये वजा झाल्याचा संदेश प्राप्त झाला. त्यामुळे ही जाहिरात बनावट असून, ऑनलाइन फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
'रेझरपे 'मार्फत 'क्रोमा'कडे पैसे ट्रान्सफर
१. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय चव्हाण, पोलिस निरीक्षक आनंद पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर अधिकारी पोलिस उपनिरीक्षक शरद देवरे, सहायक फौजदार अशोक कोंडे आणि पोलिस शिपाई विक्रम सरनोबत यांनी तातडीने पावले उचलली.
२. नॅशनल सायबर पोर्टल १९३० वर तक्रार नोंदवून बँक स्टेटमेंटची तपासणी करताच ९८ हजार रुपये 'रेझरपे'मार्फत 'क्रोमा'कडे वळविल्याचे निष्पन्न झाले.
३. सायबर सेलने एचडीएफसी बँक, रेझरपे आणि क्रोमा यांच्या नोडल अधिकारी व व्यवस्थापकांना तत्काळ संपर्क साधून ई-मेल पाठवला. त्यामुळे ९८ हजार रुपये 'होल्ड' केले. ती संपूर्ण रक्कम चौहान यांना परत करण्यात यश आले.