जुगाराचा अड्डडा चालविल्याप्रकरणी अभिनेत्री भाग्यश्रीच्या पतीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2019 04:33 IST2019-07-04T04:33:20+5:302019-07-04T04:33:31+5:30
अंधेरीत जुगाराचा अड्डा चालवण्यात त्याचा सहभाग असल्याचे तपास अधिकाऱ्याचे म्हणणे असून, त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

जुगाराचा अड्डडा चालविल्याप्रकरणी अभिनेत्री भाग्यश्रीच्या पतीला अटक
मुंबई: मैने प्यार किया या हिंदी चित्रपटातून गाजलेली बॉलीवूड अभिनेत्री भाग्यश्री हिचा पती हिमालय दासानी याला मंगळवारी अंबोली पोलिसांनी अटक केली. अंधेरीत जुगाराचा अड्डा चालवण्यात त्याचा सहभाग असल्याचे तपास अधिकाऱ्याचे म्हणणे असून, त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वी यात दासानीसह २६ जणांना अटक करण्यात आली आहे.
दासानी याला सोमवारी चौकशीसाठी अंबोली पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले. जुगाराचा अड्डा चालवण्यात त्याचा सहभाग उघड होताच, त्याला अटक करण्यात आल्याचे तपास अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. गेल्या महिन्यात ११ जून रोजी अंधेरी लोखंडवाला परिसरात जुगाराचा अड्डा सुरू असल्याची माहिती अंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत गायकवाड यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत एका फ्लॅटवर छापा टाकला. तेथून जवळपास १८ जणांना पोलिसांनी अटक केली. त्याठिकाणी पोकर कार्ड , लाखो रुपयांची रोकड आणि एक डायरी पोलिसांना सापडली. त्या डायरीत अड्ड्याचा मालक दासानी आणि त्याचा मित्र असल्याचे समजले. फ्लॅटच्या केअरटेकरला देखील अटक करण्यात आली. २६ जणांना अटक केली असून दासानी याची अटक अखेरची असल्याचे पोलिसांनी सांगितले़