पॅट पेपरफुटीप्रकरणी १२ युट्युब चॅनेलवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 06:05 IST2025-04-10T06:05:25+5:302025-04-10T06:05:44+5:30
तिसरी ते नववीपर्यंतच्या पॅट परीक्षेचे पेपर फोडल्याप्रकरणी पुण्याच्या विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पॅट पेपरफुटीप्रकरणी १२ युट्युब चॅनेलवर कारवाई
मुंबई: पॅट पेपरफुटी प्रकरणात आतापर्यंत २१ पैकी १२ युट्युब वाहिन्या पोलिसांनी बंद केल्याची माहिती महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेच्या (एससीईआरटी) संचालकांनी बुधवारी दिली. उर्वरित युट्युब वाहिन्याही बंद केल्या जातील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. परीक्षेचे पेपर पोहोचविणाऱ्या कार्गो कंपनीचीही पोलिस चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती 'एससीईआरटी'चे संचालक राहुल रेखावार यांनी दिली.
तिसरी ते नववीपर्यंतच्या पॅट परीक्षेचे पेपर फोडल्याप्रकरणी पुण्याच्या विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तसेच हे पेपर प्रसारित करणाऱ्या १२ युट्युब वाहिन्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.
तक्रारीत काय म्हटलंय?
पॅट परीक्षेकरिता राज्यातील १ कोटी १७ लाख विद्यार्थ्यांसाठी तीन कोटी ८२ लाख प्रश्नपत्रिका काळजीपूर्वक पाठवण्यात आल्या होत्या. त्या खासगी कार्गो कंपनीमार्फत प्रत्येक जिल्ह्याच्या शिक्षण अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आल्या होत्या, असे एससीईआरटीच्या सहाय्यक संचालक संगीता शिंदे यांनी पोलिसांना ८ एप्रिल २०२५ रोजी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे