अधिक अनामत रक्कम आकारल्यास कारवाई;'शुल्क नियामक'चा महाविद्यालयांना इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 07:04 IST2025-08-11T07:04:37+5:302025-08-11T07:04:45+5:30
राज्यातील वैद्यकीय कॉलेजांच्या फी लाखांची उड्डाणे

अधिक अनामत रक्कम आकारल्यास कारवाई;'शुल्क नियामक'चा महाविद्यालयांना इशारा
मुंबई : राज्यातील वैद्यकीय, उच्च व तंत्रशिक्षण, कृषी विभागांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांनी अनामत शुल्क नियामक प्राधिकरणाने (एफआरए) ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक शुल्क विद्यार्थ्यांकडून आकारू नये. विद्यार्थ्यांनी अशी अधिक रकमेची मागणी करणाऱ्या कॉलेजांची तक्रार करावी, असे आवाहन 'एफआरए'ने केले आहे. विद्यार्थ्यांकडून नियमबाह्य पद्धतीने निर्धारित केलेल्या अनामत रकमेच्या मर्यादेपेक्षा अधिक रक्कम आकारणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
राज्यातील वैद्यकीय कॉलेजांच्या फी लाखांची उड्डाणे घेत आहेत. 'एफआरए'कडून दरवर्षी कॉलेजांना हे शुल्क निर्धारित करून दिले जाते. मात्र, या शुल्काव्यतिरिक्त अनामत रक्कम, लायब्ररी शुल्क, जीमखाना शुल्क, स्टुडंट अॅक्टिव्हिटी, विविध क्लब, हॉस्टेल डिपॉझिट, मेस डिपॉझिट आदींच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात शुल्क उकळण्यात येते.
पुराव्यासह 'एफआरए'कडे तक्रार करा
यावर्षी प्रथम वर्षाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी केवळ एका वर्षाचे शुल्क महाविद्यालयांमध्ये भरावे. त्यापेक्षा अधिक शुल्काची मागणी महाविद्यालयांनी केल्यास त्याची पुराव्यासह एफआरएकडे तक्रार करावी, असे आवाहन एफआरएने केले.