Join us

‘लिव्ह इन’ला नकार दिल्याच्या रागात महिलेवर ॲसिड हल्ला; मुंबईतील गिरगावमधील भयावह घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2023 06:28 IST

महिला ५० टक्के भाजली आहे. तिची प्रकृती गंभीर आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. 

मुंबई : लिव्ह इन रिलेशनशिपला नकार दिल्याच्या रागात गिरगाव परिसरात ५२ वर्षीय महिलेवर ॲसिड हल्ला केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी घडली. महेश पुजारीला  (६२) हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी एलटी मार्ग पोलिसांनी अटक केली. 

५२ वर्षीय महिला दोन मुलांसोबत (२४ आणि २६ वर्ष) राहण्यास आहे. पती सोडून गेल्यानंतर २५ वर्षांपासून त्या पुजारीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायच्या. पुजारीचे पहिले लग्न झाले असताना तो महिलेसोबत राहण्यास होता. मुले मोठी असल्याने गेल्या काही दिवसांपासून त्यांनी पुजारीला सोबत राहण्यास नकार दिला. तसेच, पहिल्या पत्नीकडे जाण्यासाठी तगादा लावला होता. याच, रागातून जखमी महिला सकाळी साडेपाच वाजता पाणी भरण्यासाठी खाली येताच, तेथे दबा धरून बसलेल्या पुजारीने ॲसिड त्यांच्या अंगावर फेकून पळ काढला. महिला ५० टक्के भाजली आहे. तिची प्रकृती गंभीर आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. 

टॅग्स :मुंबईगुन्हेगारीपोलिस