सासरी अपमान झाल्याचा भयंकर राग; बोरीवलीत आरोपीने भांडणानंतर पेट्रोल टाकून जाळलं घर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 11:30 IST2025-04-03T11:24:41+5:302025-04-03T11:30:29+5:30
बोरीवलीत एका आरोपीने भांडणानंतर महिलेचे घर जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

सासरी अपमान झाल्याचा भयंकर राग; बोरीवलीत आरोपीने भांडणानंतर पेट्रोल टाकून जाळलं घर
Borivali Crime: बोरीवलीच्या गोराई परिसरातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दारूच्या नशेत महिलेला मारहाण आणि शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तीने रागाच्या भरात घर पेटवून दिलं. आरोपीला बोरीवली पोलिसांनी अटक केली असून तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे समोर आलं आहे. या घटनेत महिलेचे घर जळून खाक झालं असून मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. आरोपीवर कठोर कारवाईसह महिलेने भरपाईची मागणी केली आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
बोरीवलीच्या गोराई परिसरात एका आरोपीने महिलेच्या घरावर पेट्रोल शिंपडून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली. ही घटना बोरिवली पश्चिमेतील गोराई येथील भीमनगर परिसरात घडली. भांडणानंतर आरोपीने १ एप्रिल रोजी पहाटे अडीच वाजता महिलेचे घर पेटवून दिले. सुदैवाने घरात कोणीही नव्हतं. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली.
दारु पिऊन करत होता अडवणूक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ मार्च रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास भांडणाला सुरुवात झाली. विशाल उधमले असे आरोपीचे नाव असून तो रस्त्यावर खुर्चीवर बसून येणाऱ्या जाणाऱ्यांचा रस्ता अडवत होता. यावेळी पीडित महिलेने त्याला रस्त्यातून खुर्ची बाजूला काढ असं सांगितले. यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. प्रकरण इतके वाढले की ते शिवीगाळ करण्यापर्यंत पोहोचले आणि आरोपी विशाल संतापून तिथून निघून गेला.
आरोपीने शेजाऱ्यांना धमकावले
विशालने दुसऱ्या दिवशी पहाटे पेट्रोलची बाटली घेऊन परतला आणि महिलेच्या घरावर ओतून पेटवून दिले. ही संपूर्ण घटना तिथल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्यात विशाल आग लावताना स्पष्टपणे दिसत आहे. आग लावल्यानंतर आरोपी विशालने आजूबाजूच्या लोकांना धमकावले आणि कोणी पोलिसांना सांगितले तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असं धमकावले. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालं होतं. महिलेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी विशालविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली प्राथमिक पोलिस तपासात आरोपी हा त्याच्या सासरच्या आला होता आणि महिलेने अडवल्याने त्याला अपमानास्पद वाटले. रागाच्या भरात त्याने हे धक्कादायक कृत्य केले.
"घरात गरम होत असल्याने मी बाहेर येऊन बसली होती. त्यावेळी आरोपी दारु पिऊन तिथे आला आणि त्याने मला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यावेळी आम्ही त्याला काही म्हटलं. मात्र त्यानंतर त्याने आमच्यावर हात उगारण्यास सुरुवात केली. त्याने मला मारहाण केली आणि मुलाच्या अंगावर दारुची बाटली फोडली. तो दगड घेऊन आमच्या अंगावर धाऊन आल्याने आम्ही घरात पळून गेलो आणि दरवाजा बंद केला. त्यानंतर आम्ही पोलीस ठाण्यात गेलो. आम्ही पोलीस स्टेशनला जाताच त्याने पेट्रोल ओतून माझे घर जाळून टाकले," अशी माहिती पीडित महिलेने दिली.
पोलिसांनी काय सांगितले?
"३१ मार्च रोजी रात्री फिर्यादीने आमच्याकडे तक्रार दिली होती. या गुन्ह्यातील अटकेत असलेल्या आरोपी हा विनाकारण महिलेच्या घराजवळ आला आणि त्याने शिवीगाळ केली. महिला बाहेर गेली असता तिच्या मैत्रिणीने फोन करुन सांगितले की आरोपी विशालने घराला आग लावली आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर तडीपारीची कारवाई झाली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता ४ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे," अशी माहिती पोलिसांनी दिली.