१ हजार रुपयांसाठी हत्या केल्याचा आरोप; सहा वर्षे तुरुंगात काढल्यानंतर तरुणाची निर्दोष मुक्तता
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 18:49 IST2025-01-31T18:47:54+5:302025-01-31T18:49:17+5:30
२०१८ साली घडलेल्या हत्या प्रकरणात एका आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

१ हजार रुपयांसाठी हत्या केल्याचा आरोप; सहा वर्षे तुरुंगात काढल्यानंतर तरुणाची निर्दोष मुक्तता
Mumbai Crime: मित्राच्या हत्येप्रकरणी सहा वर्षांहून अधिक काळ तुरुंगात घालवलेल्या २६ वर्षीय तरुणाची मुंबई सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. १००० रुपयांसाठी मित्राची हत्या केल्याप्रकरणी हा तरुण सहा वर्षे तुरुंगात होता. अखेर सत्र न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केली. २८ सप्टेंबर २०१८ रोजी विशाल संजय अहिरे या २४ वर्षीय तरुणाच्या चाकूने वार करून मृत्यू झाल्याप्रकरणी घाटकोपरच्या पंत नगर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करुन तरुणाला अटक करण्यात आली होती.
सरकारी वकिलांनी आरोप केला की, आरोपीने विशालवर हल्ला केला कारण त्याने त्याला १,००० रुपये उधार दिलेले होते. घटनेच्या रात्री, मुख्य आरोपीने विशालवर हल्ला केला होता जो दोन साथीदारांसह नंतर फरार झाला होता. २ ऑक्टोबर २०१८ रोजी विशालचा मृत्यू झाला. त्यामुळे पोलिसांनी तत्कालीन भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ अंतर्गत आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला.
विशालची बहीण कोमल अहिरे हिच्या साक्षीवर सरकारी वकिलांनी विश्वास ठेवला होता. कोमलने दावा केला की तिने हा हल्ला होताना पाहिला होता. तिने सांगितले की, फरार सहआरोपींच्या मदतीने मुख्य आरोपीने विशालला पकडून त्याच्यावर चाकूने वार केले होते. विशालने दिलेल्या कथित मृत्यूपूर्व जबाबातही आरोपीच्या नावाचा उल्लेख होता. त्याआधारे पोलिसांनी आरोपीला अटक केली होती.
मात्र आरोपीची बाजू मांडणारे वकील ए आर बुखारी यांनी या खटल्यातील अनेक विरोधाभासांवर प्रश्न उपस्थित केले. वैद्यकीय अधिकाऱ्याच्या उपस्थितीत अखेरचा जबाब नोंदवला गेला नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. त्यामुळे जबाब देताना विशालची मानसिक स्थिती काय होती याबाबत शंका उपस्थित केली. त्याशिवाय, कोमलच्या साक्षीत तीन हल्लेखोरांचा उल्लेख होता. तर विशालने मृत्यूपूर्वी दिलेल्या जबाबात फक्त एकट्या आरोपीचे नाव होते. त्यामुळे दोघांचे जबाब विसंगत असल्याचे आरोपीच्या वकिलाने न्यायालयाला सांगितले.
न्यायालयाने फॉरेन्सिक निष्कर्षांमधील असलेल्या फरकाचीही नोंद घेतली. शवविच्छेदनात विशालवर अनेक चाकूने केलेल्या जखमा असल्याचे आढळले होते. तर कोमलने फक्त एका वाराचा उल्लेख केला. याशिवाय, पोलिसांना गुन्ह्याची माहिती दिल्यानंतर काही तासांनी एफआयआर नोंदवण्यात आला. एफआयआर नोंदवण्यास एवढा वेळ का लागला याचेही कारण देण्यात आलं नव्हतं.
ज्याने हा हल्ला होताना पाहिल्याचा दावा केला होता तो मुख्य साक्षीदारसुद्धा न्यायालयात आरोपीला ओळखू शकला नाही. दुसऱ्या साक्षीदाराने घटनास्थळावरून जप्त केलेले शस्त्र त्याच्या दुकानातून घेतल्याचे नाकारले. या विरोधाभासांमुळे, कोर्टाने असा निर्णय दिला की आरोपीचा वाजवी संशयापलीकडे दोष सिद्ध करण्यात फिर्यादी अयशस्वी ठरली. त्यामुळे २०१८ पासून कोठडीत असलेल्या आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली.