शिक्षा भोगल्यावर आरोपी निर्दोष!; खटल्यात त्रुटी राहिल्याचे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2019 02:17 AM2019-05-16T02:17:30+5:302019-05-16T02:18:35+5:30

रासगाव येथील मधुकर बसवंत बरोरा या तरुणास कल्याण येथील सत्र न्यायालयाने ही शिक्षा ठोठावली होती.

The accused is innocent due to the punishment ;; Due to the error in the prosecution | शिक्षा भोगल्यावर आरोपी निर्दोष!; खटल्यात त्रुटी राहिल्याचे कारण

शिक्षा भोगल्यावर आरोपी निर्दोष!; खटल्यात त्रुटी राहिल्याचे कारण

मुंबई : अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करणे आणि तिला आत्महत्येस प्रवृत्त करणे अशा गुन्ह्यांसाठी सत्र न्यायालयाने ठोठावलेली १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगून पूर्ण झाल्यानंतर उच्च न्यायालयाने ठाणे जिल्ह्याच्या शहापूर तालुक्यातील एका आरोपीची अपिलात निर्दोष सुटका केली आहे.
रासगाव येथील मधुकर बसवंत बरोरा या तरुणास कल्याण येथील सत्र न्यायालयाने ही शिक्षा ठोठावली होती. त्याविरुद्ध त्याने केलेले अपील मंजूर करून न्या. साधना जाधव यांनी त्याची निर्दोष मुक्तता केली. मात्र गुन्हेगारीचा कलंक पुसला जाण्याखेरीज या निकालाचा मधुकरला अन्य काही फायदा झाला नाही. कारण हा निकाल होईपर्यंत मधुकरचा १० वर्षांचा तुरुंगवास भोगून जवळपास पूर्ण झाला होता.
मधुकरच्याच वस्तीत राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीने १३ आॅक्टोबर २००९ रोजी पहाटे स्वत:ला जाळून घेऊन राहत्या घराच्या अंगणात आत्महत्या केली होती. ८२ टक्के भाजलेल्या या मुलीचा ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये १९ आॅक्टोबर २००९ रोजी मृत्यू होण्यापूर्वी तिने दिलेल्या मृत्यूपूर्व जबानीच्या आधारे गुन्हा नोंदवून मधुकरवर हा खटला दाखल झाला होता. प्रामुख्याने या मृत्यूपूर्व जबानीच्या आधारेच सत्र न्यायालयाने त्याला दोषी ठरवून शिक्षा ठोठावली होती.
अपिलाच्या सुनावणीत न्या. जाधव यांनी अभियोग पक्षाचे अनेक साक्षी-पुरावे अविश्वसनीय वाटत असल्याचे नमूद केले. पण सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सर्व साक्षीपुरावे झाल्यावर दंड प्रक्रिया संहितेच्या कलम ३१३ अन्वये स्वत: न्यायाधीश आरोपीला अनेक प्रश्न विचारून त्याचे म्हणणे नोंदवून घेतात; त्या टप्प्याला या खटल्यात मूलगामी अनियमितता झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. सत्र न्यायाधीशांनी मधुकरला त्याच्याविरुद्ध मयत मुलीने दिलेल्या मृत्यूपूर्व जबानीची सविस्तरपणे माहितीच दिली नव्हती. त्यामुळे त्याला त्याचे खंडन करण्याची परिणामकारक संधीच मिळाली नाही. न्या. जाधव यांनी म्हटले की, खटल्यातील ही त्रुटी दूर करण्यासाठी तो पुन्हा सत्र न्यायालयाकडे परत पाठवून काहीच साध्य होणार नाही. कारण त्या न्यायालयाने ठोठावलेली शिक्षा मधुकरने भोगून पूर्ण केली आहे. अशा स्थितीत अपील मंजूर करून आरोपीस निर्दोष मुक्त करणे हाच मार्ग उरतो.



दिरंगाईमुळे झाला आयुष्याचा विचका
व्यवसायाने सुतार व अशिक्षित असलेल्या मधुकरच्या आयुष्याची १० बहुमोल वर्षे न्यायालयीन दिरंगाईमुळे न केलेल्या गुन्ह्याच्या शिक्षेपोटी तुरुंगात गेली. कल्याणच्या न्यायालयाने निकाल दिल्यानंतर वर्षभरात मधुकरने उच्च न्यायालयात अपील केले. ते रीतसर नोंदले गेल्यानंतर काही दिवसांतच न्या. जाधव यांनी ते सुनावणीसाठी दाखल केले. ते अंतिम सुनावणीस येऊन त्याचा निकाल होईपर्यंत आणखी पाच वर्षे गेली. खरेतर, उच्च न्यायालयात तुरुंगात असलेल्या आरोपींच्या अपिलांची वेगळी वर्गवारी केली जाते. दुर्दैवाने मधुकरच्या बाबतीत तसे घडले नाही. सुरुवातीस अपील दाखल केले तेव्हा मधुकरने स्वत:चा वकील केला होता. नंतर त्याला सरकारतर्फे अ‍ॅड. श्रद्धा सावंत या वकील देण्यात आल्या. त्यांनी केलेल्या उत्तम कामाची न्या. जाधव यांनी आवर्जून नोंद घेतली.

Web Title: The accused is innocent due to the punishment ;; Due to the error in the prosecution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.