गौरी टेंबकर
मुंबई : बोरिवली जनरल लॉकअपमध्ये दिपक जाधव (२८) नामक पुण्यातून ताब्यात घेतलेल्या आरोपीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. सकाळी ८.१० च्या सुमारास हा प्रकार उघडकीस आले. जाधवने तिसऱ्या सेलच्या दरवाज्याच्या खीळयाला कुठल्यातरी धाग्याने गळफास घेतला असून त्यास तात्काळ उतरवून बेशुद्ध अवस्थेत शताब्दी हॉस्पिटल येथे रवाना केले गेले.
तेव्हा डॉक्टरांनी त्याला तपासून त्यास ८.४५ च्या सुमारास मयत घोषित केले आहे. जाधव हा बोरिवली पश्चिम च्या रामचंद्र भंडारी चाळीत राहत होता. त्याच्यावर बोरिवली पोलीस ठाण्यात २६ जुलै रोजी ३२६, २७९, ३२३, ५०४ आणि ५०६ या कलमांतर्गत गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली होती. त्याला न्यायालयाने २८ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती त्यामुळे त्याला बोरवली जनरल लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते. पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस त्या ठाण्यात त्याच्यावर कलम ३०२ अंतर्गत गुन्हा नोंद आहे. पुणे पोलिसांकडून बोरिवली पोलिसांनी त्याचा ताबा घेतला होता. दरम्यान, याप्रकरणी बोरिवली पोलीस अधिक तपास करत आहेत.