‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 03:09 IST2025-05-15T03:09:17+5:302025-05-15T03:09:17+5:30
लाडकी बहीण योजनेतील बँक खाती ही टोळी अवघ्या ३० हजारांत फसवणूक आणि मनी लाँड्रिंगसाठी सायबर भामट्यांना विकत असत.

‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवून झोपडपट्टीतील अशिक्षित, गरजू महिलांना जाळ्यात ओढायचे... त्यांच्या कागदपत्रांद्वारे नव्या सीमकार्डसह बँक खाते उघडायचे... महिलांच्या हाती हजारभर रुपये थोपवून दर महिन्याला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतील, असे आश्वासन द्यायचे आणि नॉट रिचेबल व्हायचे, अशी मोडस ऑपरेंडी वापरणाऱ्या टोळीतील तिघांना जुहू पोलिसांनी अटक केली आहे. ही टोळी अवघ्या ३० हजारांत महिलांच्या नावे उघडलेली बँक खाती सायबर भामट्यांना विकत असल्याचे उघड झाले आहे.
अविनाश कांबळे, फाल्गुनी जोशी आणि श्रुती राऊत अशी आरोपींची नावे आहेत. सुरतमधून ही टोळी मुंबईतील गरीब महिलांना आपले ‘लक्ष्य’ बनवत होती. या टोळीने नेहरू नगर, डी.एन. नगर आणि धारावीसह अनेक झोपडपट्ट्यांतील महिलांची फसवणूक केली आहे. ही टोळी गरीब महिलांना लक्ष्य करत महिलांना लाडकी बहीण योजनेतून पैसे मिळवून देण्याचे आश्वासन देत होती. आरोपी महिलांकडून आधार कार्ड, पासबुक, पॅनकार्डसह सर्व कागदपत्रे घेऊन नव्या सीमकार्डद्वारे बँक खाते उघडत असत. त्यानंतर ही बँक खाती फसवणूक आणि मनी लाँड्रिंगसाठी सायबर भामट्यांना विकत असत.
असे आले एकत्र
आरोपी रितेश जोशी याने अविनाशला पैशांचे आमिष दाखवून टोळीत सामील करून घेतले. पुढे फाल्गुनी आणि श्रुती या दोन गृहिणीही या टोळीत सामील झाल्या. यामागील मुख्य सूत्रधारासह रितेश आणि साथीदारांचा शोध सुरू आहे.
प्रकरण असे उघडकीस...
विलेपार्लेत नेहरू नगरमधील वकील सय्यद खान (२२) हे कामगार आहेत. त्यांनी १३ फेब्रुवारीला केलेल्या तक्रारीतून हे प्रकरण उजेडात आले. त्यांच्या पत्नीच्याही नावे आरोपींनी खाते उघडून दिले आणि त्याबदल्यात हजार रुपये हातावर ठेवले. त्यांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांना कळवले. त्यामुळे या टोळीचा पर्दाफाश झाला.
दीड वर्षापासून फसवणूक
जुहू पोलिसांनी महिलांना फसवून उघडलेली दीडशे बँक खाती शोधून त्यावरील सुमारे २० लाख रुपये गोठवले आहेत. आरोपी कांबळे वसईत राहतो. दीड वर्षापासून तो विविध ठिकाणी जाऊन बँक खाती उघडून भामट्यांना विकत होता. त्याला एका खात्यामागे ४ हजार रुपये मिळत होते. अशा खात्यांचा आकडा अडीच हजारांहून अधिक आहे, असे पोलिसांनी सांगितले.