जास्तीचे प्रवासी घेऊन जाताना रिक्षाला अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 05:32 IST2018-08-30T05:31:55+5:302018-08-30T05:32:30+5:30
एकाचा मृत्यू, मेट्रो पुलाखाली घडली दुर्घटना

जास्तीचे प्रवासी घेऊन जाताना रिक्षाला अपघात
मुंबई : जास्तीचे प्रवासी घेऊन भरधाव वेगाने निघालेल्या रिक्षाची बसला धडक बसली. यात एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. या प्रकरणी घाटकोपर पोलिसांनी रिक्षाचालक राजेंद्र ठाकूरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास हा अपघात घडला. नेहमीप्रमाणे ठाकूर अवैधरीत्या प्रवासी भाडे घेऊन निघाला होता.
घाटकोपर जागृतीनगर मेट्रो रेल्वे स्थानकाखाली त्याचा रिक्षावरील ताबा सुटला. रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या बसला रिक्षाने जोरात धडक दिली. यामध्ये रिक्षाचालकासह प्रवासी गंभीर जखमी झाले. यात प्रवासी खिमगर गोस्वामी (५४) या प्रवाशाचा मृत्यू झाला.
घटनास्थळी दाखल झालेल्या घाटकोपर पोलिसांनी सर्व जखमींना उपचारांसाठी राजावाडी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी खिमगर यांना मृत घोषित केले. या प्रकरणी खिमकर यांच्या नातेवाइकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून रिक्षाचालकाला अटक केली आहे.