कोस्टल रोड भुयारी मार्गात अपघात: आरटीओ टॅक्सी मदत पथकाची तत्पर मदत
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 23:39 IST2025-06-13T23:39:24+5:302025-06-13T23:39:47+5:30
घटनेच्या वेळी मुंबई सेंट्रल आरटीओ कार्यालयाच्या टॅक्सी मदत पथकाचे वाहन अपघातस्थळाजवळून जात होते.

कोस्टल रोड भुयारी मार्गात अपघात: आरटीओ टॅक्सी मदत पथकाची तत्पर मदत
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शुक्रवारी संध्याकाळी ७:३० वासता कोस्टल रोड भुयारी मार्गावर जोरदार पावसामुळे एक चारचाकी वाहन घसरून रस्त्याच्या मधोमध पलटले. सुदैवाने गाडीच्या दोन्ही एअर बॅग्स उघडल्या गेल्यामुळे आणि चालकाने सीट बेल्ट लावलेला असल्यामुळे गंभीर दुखापत टळली. मात्र, वाहन रस्त्यावर उलटल्यामुळे काही वेळ वाहतूक कोंडी निर्माण झाली.
घटनेच्या वेळी मुंबई सेंट्रल आरटीओ कार्यालयाच्या टॅक्सी मदत पथकाचे वाहन अपघातस्थळाजवळून जात होते. त्यांनी कोस्टल रोडवरील आपत्कालीन लँडलाइन फोनचा वापर करून तत्काळ कंट्रोल रूमला संपर्क साधत ॲम्बुलन्स आणि टोइंग व्हॅन मागवली. मदत पथकातील सदस्यांनी त्वरित परिस्थिती हाताळत इतर वाहनचालकांमध्ये घबराट होऊ न देता आणि ट्राफिक जाम होऊ न देता वाहनाभोवतीचा परिसर मोकळा केला. टोइंग व्हॅन आल्यावर, पलटलेले वाहन सरळ करण्यासाठी इतर वाहनचालकांच्या मदतीने प्रयत्न करण्यात आले. त्यानंतर वाहनाचे टोइंग करण्यात आले.
या संपूर्ण घटनाक्रमात मुंबई सेंट्रल आरटीओचे टॅक्सी मदत पथकातील अमोल पवार, निलेश शेटे व संतोष शिंपी यांनी अत्यंत तत्पर आणि शिस्तबद्ध सेवा बजावली.