एसी लोकलचे प्रवासी घामाघुम! पश्चिम रेल्वेचा भोंगळ कारभार, ३४ सेवा ऐन उन्हाळ्यात रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 10:06 IST2025-03-28T10:06:45+5:302025-03-28T10:06:45+5:30

‘पैसे एसीचे देतो, मिळतो उकाडा’, पासधारक संतप्त

AC local passengers feel heat as Western Railway mismanagement 34 services cancelled in summer | एसी लोकलचे प्रवासी घामाघुम! पश्चिम रेल्वेचा भोंगळ कारभार, ३४ सेवा ऐन उन्हाळ्यात रद्द

एसी लोकलचे प्रवासी घामाघुम! पश्चिम रेल्वेचा भोंगळ कारभार, ३४ सेवा ऐन उन्हाळ्यात रद्द

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: पश्चिम रेल्वेने गुरुवारी १७ वातानुकूलित (एसी) लोकल सेवा रद्द करून त्याऐवजी नॉन-एसी सेवा चालवल्याने एसी लोकलच्या नियमित प्रवाशांना घामाघूम होत प्रवास करावा लागला. आज, शुक्रवारी आणखी १७ नॉन-एसी सेवा चालवण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रकारामुळे प्रवासी संतापलेच, पण पश्चिम रेल्वेच्या कारभाराचेही वाभाडे निघाले.

एका एसी लोकलमध्ये गुरुवारी बिघाड झाल्याने ती कारशेडमध्ये गेली. याचा  परिणाम अन्य एसी सेवांवर झाला आणि प्रशासनाला त्या नॉन-एसी चालवाव्या लागल्या. नियमितपणे एसी लोकलने चर्चगेट ते बोरिवली, भाईंदर आणि विरार दरम्यानच्या प्रवाशांना होरपळत प्रवास करावा लागला.

बिघाड आवरा

गर्दीच्या वेळी अनेक स्थानकांवर एसी लोकलमध्ये क्षमतेपेक्षा जादा प्रवासी चढत असल्याने दरवाजे बंद न होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. गर्दी कमी करण्यासाठी एसी सेवांमध्ये वाढ करण्याची गरज आहे. पण गाड्यांमध्ये बिघाड होत असल्याने प्रवाशांचा त्रास मात्र वाढला आहे.

‘पैसे एसीचे देतो, मिळतो उकाडा’

एसी लोकलचे पासधारक आणि तिकीट काढूनही नॉन-एसी गाड्यांमधून प्रवास करावा लागत असल्याने प्रवाशांचा संताप होत आहे. ‘आम्ही एसीचे पैसे भरतो, पण मिळते काय? उकाडा आणि घाम’ अशी तक्रार एका नियमित प्रवाशाने केली. आणखी एक नियमित प्रवासी म्हणाला, ‘गर्दीच्या वेळी नॉन-एसी गाडीत श्वास घेणेही कठीण होते. तातडीने उपाययोजना करा.’ प्रवाशांनी एसी गाड्यांची संख्या वाढवण्याबरोबरच बिघाड टाळण्यासाठी कायमस्वरूपी पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे.

प्रवासी वाढताहेत, गाड्या अपुऱ्या

मुंबईतील उपनगरीय रेल्वे मार्गांवर उन्हाळ्यात वातानुकूलित लोकलने प्रवास करणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. मात्र, पुरेशा एसी गाड्या नसल्याने रेल्वेची अडचण होत आहे. गाड्यांची संख्या वाढवल्यास उन्हाळ्यात एसी लोकलने प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळू शकेल.

Web Title: AC local passengers feel heat as Western Railway mismanagement 34 services cancelled in summer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.