हवामानाचा अचूक अंदाज वर्तविण्याची क्षमता वाढली - होसाळीकर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2019 03:27 AM2019-08-10T03:27:48+5:302019-08-10T03:27:58+5:30

भारतीय हवामानाची प्रक्रिया गुंतागुंतीची; मेगासिटी फोरकास्ट सीस्टिममुळे क्षमता वाढणार

The ability to accurately predict the weather has increased - hoarse | हवामानाचा अचूक अंदाज वर्तविण्याची क्षमता वाढली - होसाळीकर

हवामानाचा अचूक अंदाज वर्तविण्याची क्षमता वाढली - होसाळीकर

Next

- सचिन लुंगसे 

मुंबई : अद्ययावत प्रणालीचा वापर करत गेल्याने मागील काही वर्षांत हवामानाचा अंदाज देण्याच्या क्षेत्राचे अंतर २०० किलोमीटरहून १२ किलोमीटरपर्यंत कमी करण्यात यश आले आहे. डॉपलर-रडारच्या मदतीने पुढील दोन तासांत कुठे, किती पाऊस पडेल, याचा अचूक अंदाज आता वर्तवता येतो. हवामान खात्याच्या नियोजनात ‘मेगासिटी फोरकास्ट सिस्टीम’ असून, यामुळे हवामानाचे अचूक अंदाज वर्तविण्यात हवामान खाते आणखी सक्षम होईल, असा विश्वास मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत व्यक्त केला.

भारतीय हवामान शास्त्र विभाग १८७५ सालापासून कार्यान्वित असून, १५० वर्षांच्या माहितीचा साठा हवामान खात्याकडे आहे. अशी माहिती कोणाकडेही नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही माहिती दिवसागणिक जमा होत असून, ती पूर्णत: विश्वसनीय आहे. सरकारी यंत्रणांना ही माहिती आम्ही पुरवतो.

हवामान खाते ही एक ‘नोडल एजन्सी’ असल्याचे सांगत होसाळीकर म्हणाले, प्रत्येकाच्या गरजेनुसार या माहिती पुरवली जाते. पण अंदाज देण्याचा काळ जेवढा जास्त तेवढी त्यातील अचूकता कमी होत जाते. विमानतळ प्राधिकरणांना दर अर्ध्या तासाने अंदाज दिला जातो. अन्य सर्व यंत्रणांना बारा तासांनी, मुंबईसारख्या महानगरांना दर सहा तासांनी तर शेतकऱ्यांसाठी पुढील पाच दिवसांसाठीचे अंदाज दिले जातात. विमानतळांचा अंदाज ९५ टक्के, अन्य यंत्रणांचे साधारण ९० टक्के, तर शेतकऱ्यांना पुरवलेले अंदाज सरासरी ७० टक्के अचूक ठरतात.
राज्यभरात दोन हजार स्वयंचलित हवामान केंद्रे कार्यान्वित असून, हवामान खाते दर पंधरा मिनिटांत पडलेल्या पावसाची नोंद करते. परदेशातील उदाहरणे देत किंवा अंदाजाची तीव्रता कमी झाली, तर त्याचा उल्लेख करत हवामान खात्यावर टीका होत असली, त्यामुळे नुकसान झाल्याचे आजवर कोणत्याही शासकीय यंत्रणेने सांगितलेले नाही, याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. हवामानासंदर्भातील अंदाज १०० टक्के बरोबर येतीलच, असे नाही. अंदाजापेक्षा पावसाची तीव्रता कमी-जास्त होते. ही प्रक्रिया शास्त्रीय आणि गुंतागुंतीची असते.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे पाऊस पडणार नाही, हे सांगणेदेखील कठीण असते. त्यामुळे आम्ही शक्य होत असेल तेव्हा सुधारित अंदाजही देतो.

या स्थितीतही हवामान खात्याने प्रगती केली आहे. डॉपलर-रडार, सुपर कॉम्प्युटर, बलून अशा वेगवेगळ््या साधनांमुळे तपशील गोळा करण्याची, त्याच्या विश्लेषणाची पद्धत अद्ययावत होत आहे, असे होसाळीकर यांनी सांगितले. मुंबई महापालिका आणि मच्छीमार संघटनांनाही नियमितपणे हवामानेच अंदाज दिले जातात. सोशल मीडियाचाही वापर केला जात आहे. त्यातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती पोहोचवली जाते. या माहितीसाठी वापरली जाणारी भाषा, ज्यांना हा अंदाज वापरायचा आहे, त्यांची अपेक्षा आम्ही समजून घेत आहोत, अशी माहिती होसाळीकर यांनी दिली.

डॉपलर रडार वाढवणार
हवामान खाते देशभरात ५५ डॉपलर रडार बसवत आहे. त्यातील २५ बसवली आहे. अमरनाथ यात्रेकरूसाठीही नुकतेच एक रडार बसविण्यात आले आहे.
राज्यात मुंबई, नागपूर आणि सोलापूरमध्ये डॉपलर रडार आहे. आता रत्नागिरीत ते बसविले जाणार आहे.
मुंबईत सध्या दोन डॉपलर रडार असून, आणखी चार बसविणार आहोत.
पावसाच्या नोंदी होत असलेले १५० रेन गेज मुंबईत कार्यरत आहेत. यात आणखी १०० ची भर पडणार आहे. त्यासाठी जागा मिळणे आणि ही गेज सुरक्षित राहण्याकडे लक्ष पुरवित आहोत.
मुंबईकरांना पंधरा मिनिटांच्या अंतराने पावसाची नोंद उपलब्ध करून दिली जात आहे.

 

 

Web Title: The ability to accurately predict the weather has increased - hoarse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :weatherहवामान