आरे-कफ परेड भुयारी मेट्रोतून आजपासून प्रवास; सकाळी ५.५५ वाजता पहिली गाडी; गर्दीच्या वेळी पाच मिनिटांनी सेवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 08:17 IST2025-10-09T08:17:38+5:302025-10-09T08:17:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : आरे-कफ परेड भुयारी मेट्रो ३ मार्गिकेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी लोकार्पण करण्यात ...

आरे-कफ परेड भुयारी मेट्रोतून आजपासून प्रवास; सकाळी ५.५५ वाजता पहिली गाडी; गर्दीच्या वेळी पाच मिनिटांनी सेवा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आरे-कफ परेड भुयारी मेट्रो ३ मार्गिकेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी लोकार्पण करण्यात आले. त्यामुळे गुरुवारी सकाळी ५.५५ वाजेपासून या संपूर्ण मार्गावर प्रवासी वाहतूक सुरू होणार आहे. गर्दीच्या वेळी दर पाच मिनिटांनी गाडी धावणार आहे. या सेवेमुळे मुंबईकरांना कफ परेड ते आरे हा प्रवास केवळ एका तासाच्या आत करता येणार आहे.
एमएमआरसीने आरे-कफ परेड दरम्यान ३३.५ किमी लांबीची मेट्रो मार्गिका उभारली असून त्यावर २७ स्थानके आहेत. यासाठी ३७,२७६ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. आता शेवटच्या टप्प्यातील आचार्य अत्रे चौक ते कफ परेडपर्यंतचा १०.९९ किमी लांबीच्या मार्गावर आणि ११ स्थानकांवर मेट्रो सेवा गुरुवारपासून सुरू होत आहे. त्यासाठी एमएमआरसीच्या ताफ्यात ३१ गाड्या आहेत. त्यातील २८ गाड्यांच्या माध्यमातून सेवा दिली जाणार असून दिवसभरात या २८० फेऱ्या होणार आहेत. सद्य:स्थितीत मेट्रो ३ मार्गिकेच्या आरे ते आचार्य अत्रे चौक मार्गावर दरदिवशी सरासरी ७० हजार जण प्रवास करतात. दरम्यान आरे-कफ परेड या संपूर्ण मार्गावरील सेवा सुरू झाल्यावर उपनगरीय रेल्वेवरील ताण १५ टक्क्यांनी कमी होईल, असा दावा मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) केला आहे.
नियोजन असे...
सकाळी ५.५५ वाजता पहिली गाडी सुटेल, तर रात्री १०.३० वाजता शेवटची गाडी सुटेल. ही गाडी रात्री ११.२५ वाजता शेवटच्या स्थानकावर पोहचेल.
मंत्रालयही जवळ
नरीमन पॉइंट, कफ परेड, फोर्ट, लोअर परेल, बीकेसी, सीप्झ ही उद्योग केंद्र. तसेच आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल १ आणि टर्मिनल २ यांच्याशी थेट जोडणी. मंत्रालय, उच्च न्यायालय आणि अन्य केंद्रांशी थेट जोडणी.
थेट गिरगावात...
वरळी, गिरगाव, काळबादेवी आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ जोडले जाणार. तसेच ३० शिक्षण संस्था, १४ धार्मिक आणि ३० मनोरंजन स्थळे जोडली जाणार.