मनोज जरांगेंच्या आंदोलनाला आपचा पाठिंबा; खासदार संजय सिंह म्हणाले, 'त्यांच्या मागण्या प्रामाणिक'
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 12:53 IST2025-09-02T12:42:45+5:302025-09-02T12:53:30+5:30
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आम आदमी पक्षाचे पाठिंबा दिला.

मनोज जरांगेंच्या आंदोलनाला आपचा पाठिंबा; खासदार संजय सिंह म्हणाले, 'त्यांच्या मागण्या प्रामाणिक'
AAP Sanjay Singh Meet Manoj Jarange Patil: ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे गेल्या चार दिवसांपासून आझाद मैदानात आंदोलन करत आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनासाठी ४० हजारांहून आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. मात्र आंदोलकांनी सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोंधळ घातल्याने हायकोर्टाने फटकारलं. मुंबई पोलिसांनीही मनोज जरांगे पाटील यांना नोटीस बजावली आहे. दुसरीकडे विरोधकांनीही मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देणे सुरु ठेवलं आहे. आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी मनोज जरांगेंची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दर्शवला.
मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी सरकारविरोधात एल्गार पुकारला आहे. मुंबई पोलिसांच्या नोटीशीनंतर नियमांचं पालन करून आमचं आंदोलन शांततेत सुरू राहणार आहे, सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही अशी भूमिका मनोज जरांगे यांनी घेतली. त्यानंतर आपचे खासदार संजय सिंह यांनी मनोज जरांगे यांची भेट घेत त्यांना पाठिंबा दिला.
"त्यांच्या मागण्या खूप प्रामाणिक आहेत. ते अनेक वर्षांपासून उपोषण, आंदोलन आणि मेळावे घेऊन ही लढाई लढत आहेत. मी आपचा संदेश देण्यासाठी आलो आहे. आम्ही त्यांच्या चळवळीला पूर्ण पाठिंबा देतो. मी सरकारकडे मागणी करतो की सरकारने वारंवार विश्वासघात केला आता यावर उपाय शोधा," असं संजय सिंह यांनी म्हटलं.
VIDEO | Mumbai: AAP MP Sanjay Singh on meeting Maratha activist Manoj Jarange Patil says, “His demands are very genuine. He has been fighting this battle for many years, holding fasts, rallies and gatherings. I came to convey AAP’s message that we fully support his movement.”… pic.twitter.com/tasTn51SjN
— Press Trust of India (@PTI_News) September 2, 2025
आमच्याकडून आणखी काय अपेक्षा आहे
"गेल्या दोन वर्षांपासून शांतततेनं आंदोलन करतोय. न्यायदेवता आमच्या वेदना जाणून घेईल आणि आम्ही कुठंही लोकशाही, कायदा आणि नियमाचं उल्लंघन केलं नाही. न्यायालयाच्या आदेशानंतर चार ते पाच तासात रस्त्यांवरून आमच्या गाड्या निघाल्या, ज्यानंतर कुठेही वाहतूक कोंडी दिसत नसल्याचं म्हणत आपण, आंदोलकांनी न्यायदेवतेचा आदेश पाळला आहे. आमच्याकडून आणखी काय अपेक्षा आहे, आणखी काय करु?" असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं.
"सरकारनं न्यायालयात जाऊन आमच्याविरोधात जाण्याचा प्रयत्न केला तरी सांगतो, हैदराबाद, सातारा गॅझेटनुसार सगळ्या मागण्यांची अमंलबजावणी झाल्याशिवाय मुंबई सोडत नाही. मराठा आणि कुणबी एकच आहेत. सगेसोयरेंच्या अधिसूचनेची अंमलबदजावणी झाली पाहिजे," असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं.