दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 18:27 IST2025-07-03T18:25:35+5:302025-07-03T18:27:35+5:30
Disha Salian News: दिशा सालियान प्रकरणावरून पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत.

दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
Disha Salian News:दिशा सालियान मृत्यू प्रकरणात पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहेत. दिशा सालियानच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिसांच्या एसआयटी किंवा सीबीआय कडून करावी, अशी मागणी केली होती. परंतु, महाराष्ट्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयात सांगितले की, दिशा सालियान यांच्या मृत्यूमध्ये कोणत्याही प्रकारच्या संशयाला वाव नाही. यावरून भाजपा आणि ठाकरे गटातील नेत्यांमध्ये दावे-प्रतिदावे सुरू आहेत. या प्रकरणात खुद्द आता आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पत्रकारांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, ठराविक लोकांकडून गेल्या ५ वर्षांत बदनामीचा प्रयत्न झाला. मी त्यांना कधी उत्तर दिली नाही. आजही देणार नाही. ज्या विषयाशी माझा संबंध नाही, ज्याची मला माहितीही नाही, त्याबाबत मी बोलणार नाही, असे आदित्य ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले.
सुधीर मुनगंटीवार हे अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत
सुधीर मुनगंटीवार हे अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत. भाजपामधील मराठीवर प्रेम करणारी लोक सोबत येत असतील, तर स्वागत आहे. मीरा रोड येथील प्रकरण हा भाषेचा वाद नाही, त्या व्यापाऱ्याने दादागिरी करण्याचा प्रयत्न केला होता. फोन चार्जिंगवरुन आमच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केली. मातृभाषेचा मान राखलाच पाहिजे, असे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, ससून डॉक परिसरात राहणाऱ्या कोळी बांधवांना सरकारने न्याय द्यावा हीच आमची मागणी आहे. धारावी प्रकल्पात पहिल्या यादीत काही लोकांना अपात्र केले आहे. ही लोक बांगलादेशी असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या लोकांना देवनार डंपिग ग्राऊड येथे पुनर्वसन केले जाणार आहे. तेथील अनेक कचऱ्यासंदर्भात कंत्राट अदानी समूहातील कंपनीला देण्यात आले आहे, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे.