Aaditya Thackeray News: औरंगजेबाच्या कबरीला हटविण्यावरून नागपुरातील महाल परिसरात सायंकाळी तरुणांच्या दोन गटांत भीषण राडा झाला. यातून वातावरण तापले व मोठा जमाव रस्त्यांवर उतरला. यात काही असामाजिक तत्त्वांनी जाळपोळ केली व पोलिसांच्या दिशेने दगडफेक करत धक्काबुक्की केली. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. दगडफेकीत १५ पोलिस जखमी झाल्याचे वृत्त असून रात्री उशिरापर्यंत धरपकड मोहीम राबवत पोलिसांनी अनेक तरुणांना ताब्यात घेतले. यावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू असून, ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारवर टीका केली.
विधान भवनात पत्रकारांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, नागपूरमध्ये हिंसाचाराची घटना घडली. मला एक प्रश्न पडला आहे की, मुख्यमंत्री कार्यालयाकडून का काही प्रतिसाद किंवा माहिती देण्यात आली नाही. जेव्हा अफवा पसरवल्या जात होत्या, तेव्हा मुख्यमंत्री कार्यालयाने का कोणती प्रतिक्रिया दिली नाही. मुख्यमंत्री कार्यालयाचे काम मी अगदी जवळून पाहिले आहे. जेव्हा राज्यात कुठेही अशी घटना होते, तेव्हा मुख्यमंत्री कार्यालयाला माहिती येते. एक अहवाल येतो. गृह विभागालाही माहिती आणि रिपोर्ट येतो. या विभागांना असे काही होणार आहे, याची कल्पना आली नाही का? नागपूर हे तर मुख्यमंत्री महोदयांचे शहर आहे. ते मुख्यमंत्रीही आहेत आणि गृहमंत्रीही आहेत.
भाजपाला महाराष्ट्राचा मणिपूर करायचाय
माझा असा अंदाज आहे की, भाजपाला महाराष्ट्राचा मणिपूर करायचा आहे. गेल्या वर्षभरात मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. कोणाला जाळले जात आहे, कोणाला मारून टाकले जात आहे. आता तिथे कोणती गुंतवणूक जाऊ शकेल का, कोणी पर्यटनाला तिथे जाऊ शकेल का, याचे उत्तर नाही असेच आहे. हेच आता त्यांना महाराष्ट्रात करायचे आहे. महाराष्ट्रातही तशीच परिस्थिती त्यांना निर्माण करायची आहे. जिथे भाजपाला सत्ता राबवता येत नाही, तिथे दंगली घडवण्याचे काम केले जाते, अशी जोरदार टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
दरम्यान, आपला देश शक्तिशाली आहे. परंतु, भाजपावाले आपल्या देशातील शक्ती तोडू पाहत आहे. देशातील लोकांना धर्माच्या नावाखाली विभागले जात आहे. देशातील लोकांना जातीत विभागले जात आहे. असे केल्याने देशाची खरी ताकद जगाला दाखवता येणार नाही. भाजपा सरकारचे अपयश आहे. महाराष्ट्रात गेल्या तीन ते चार महिन्यांपासून जेव्हा भाजपाचे सरकार स्थापन झाले आहे, तेव्हापासून महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. शेतकरी आत्महत्या करत आहेत. शेअर बाजारात मोठी पडझड सुरू आहे. या सगळ्या गोष्टी पुढे येऊ नयेत. या मुद्द्यांकडे जनतेचे दुर्लक्ष व्हावे, यासाठी कबरीचा मुद्दा उकरून काढला गेला आहे, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला.