“महायुती सरकार म्हणजे अदानी सरकार, मुंबईकरांवर आता ‘अदानी कर’ लादला जाणार”: आदित्य ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 19:28 IST2025-01-29T19:27:11+5:302025-01-29T19:28:46+5:30
Aaditya Thackeray PC News: मुंबईत होत असलेल्या प्रदूषणावर कोणतेही काम दिसत नाही. राज्य सरकारकडून मुंबईकरांना उत्तर द्यायलाही कोणी पुढे येत नाही, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

“महायुती सरकार म्हणजे अदानी सरकार, मुंबईकरांवर आता ‘अदानी कर’ लादला जाणार”: आदित्य ठाकरे
Aaditya Thackeray PC News: मुंबई महापालिकेतील ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका राजूल पटेल यांच्यासह मुंबई, नाशिक, कोल्हापूर सांगली तसेच जळगाव जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. ठाकरे गटाला लागलेली गळती थांबता थांबत नाही. आतापर्यंत उद्धवसेनेचे ३७ माजी नगरसेवक शिंदेसेनेत गेले आहेत. राजूल पटेल यांनी दिलेली सोडचिठ्ठी हा पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. तसेच नुकतेच खासदार संजय राऊत यांचा पुणे दौरा झाला. यानंतर ठाकरे गटातील ४०० ते ५०० कार्यकर्ते शाखाप्रमुख आणि विभाग प्रमुखांनी पक्षाला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला.
मुंबईचा बालेकिल्ला कायम ठेवण्याचे उद्धवसेनेसमोर आव्हान आहे. आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धवसेनेने पक्षबांधणी सुरू केली आहे. जे तगडे नगरसेवक शिंदेसेनेत गेले आहेत, त्यांच्या जागी आता तेवढ्याच तुल्यबळ उमेदवाराचा उद्धवसेनेला शोध घ्यावा लागणार आहे. महत्त्वाचे माजी नगरसेवक शिंदेसेनेत गेल्याने त्या गटाचे वजन वाढणार असेल तर ते उद्धवसेनेपुढे मोठे आव्हान असणार आहे. असे असताना ठाकरे गटाने ज्यांना जायचे त्यांना जाऊ दे, अशी भूमिका घेतली आहे. एकीकडे ठाकरे गटाला लागलेली गळती थांबताना दिसत नसून, दुसरीकडे आदित्य ठाकरे सातत्याने महायुती सरकारवर टीका करताना पाहायला मिळत आहेत.
मुंबईकरांवर आता ‘अदानी कर’ लादला जाणार
पत्रकार परिषदेत बोलताना आदित्य ठाकरे यांनी सांगितले की, आता अदानी सरकार आले आहे, अदानी समूहाचे सरकार आले आहे. भाजपा सरकार म्हणजेच अदानी समूहाचे सरकार आहे. यापूर्वी भाजपाचे असो की शिंदेंचे आमदार असो ते मदर डेअरीच्या प्लॉटवर गार्डन बनवू असे खोटे सांगत होते. आता धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी कुर्ला मदर डेअरीचा प्लॉट बाजार भावापेक्षा १० टक्के कमी दराने दिला जात आहे, असे समजत आहे. अदानी समूह मुंबई गिळायला निघाला आहे, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली.
दरम्यान, अदाणी समूहाला भाजपा सरकार जेवढ्या काही सवलती आहेत, त्या सर्व देत आहे. आता केंद्राचा अर्थसंकल्प येत आहे. आम्हाला समजले आहे की, मुंबईवर आता वेगळा कर येणार आहे. तो म्हणजे अदानी कर. आपण कर भरतो आणि त्याचा फायदा अदानींना होत आहे. मुंबईत होत असलेल्या प्रदूषणावर कोणतेही काम दिसत नाही. राज्य सरकारकडून उपाय-योजना सोडा, नागरिक आणि मुंबईकरांना उत्तर द्यायलाही कोणी पुढे येत नाही. हे असे हाल सर्वत्र आहेत. तसेच मुंबई सगळीकडेच खोदून ठेवली आहे, या शब्दांत आदित्य ठाकरेंनी निशाणा साधला.