संचमान्यतेसाठी आधार नोंदणी आवश्यक पण नोंदणी करायची कशी ?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2020 05:37 PM2020-06-04T17:37:51+5:302020-06-04T17:38:14+5:30

लॉकडाऊन काळात शिक्षकांसमोर प्रश्न

Aadhaar registration required for grouping but how to register? | संचमान्यतेसाठी आधार नोंदणी आवश्यक पण नोंदणी करायची कशी ?

संचमान्यतेसाठी आधार नोंदणी आवश्यक पण नोंदणी करायची कशी ?

Next


मुंबई : शालेय शिक्षण विभागाने मागच्या वर्षीसह यावर्षीची संचमान्यता करण्याच्या निर्णय घेतलाआणि त्यात विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट करण्याची अट टाकण्यात आली आहे. त्याशिवाय शाळांची संचमान्यता होणार नसल्याचे निर्देश देण्यात आले आहे. मात्र कोरोनामुळे शाळा आणि शिकवणी बंद असताना,  विद्यार्थ्यांचे आधारकार्ड अपडेट करायचे कसे? हा प्रश्‍न शाळा आणि शिक्षकांना पडला आहे. त्यातच ज्या विद्यार्थ्यांचे आधारच नाही अशा विद्यार्थ्यांचे आधार लॉकडाऊन उठल्यावर त्वरित काढून अपडेट करण्याच्या सूचना शिक्षण संचालनालयाकडून देण्यात आल्या आहेत. मात्र अजून कोरोनाचा प्रभाव कमी झालेला नसताना बायोमेट्रिकद्वारे विद्यार्थ्यांच्या बोटाचे ठसे घेऊन त्यांची सुरक्षितता धोक्यात आणायची का ? असा सवाल या निमित्ताने पालकही उपस्थित करत आहेत. राज्यात एकूण ५७. ३३ % विद्यार्थ्यांचीच आधार नोंदणी झाली असून ४२. ६७ % विद्यार्थ्यांची आधार नोंदणी अद्याप बाकी आहे. मुंबईमध्ये आधार नोंदणी नसलेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी ५५. ५१ % आहे.

राज्यातील प्राथमिक ते माध्यमिक शाळांच्या संचमान्यता एनआयसीमार्फत तयार करून जिल्हास्तरावर शिक्षणाधिकारी यांच्या लॉग-इनवर उपलब्ध करून देण्यात येतात. शिक्षणाधिकारी यांचे स्तरावरून संबंधित शाळांना संचमान्यता देण्याची कार्यवाही करण्यात येते. शिक्षण विभागाने 'स्टूडंट' पोर्टलवर विद्यार्थ्यांची माहिती अद्ययावत करण्याच्या सूचना राज्यातील शाळांना दिल्या आहेत. २०१९-२०मध्ये या पोर्टलवर माहिती नोंदवताना बहुतांश विद्यार्थ्यांचे आधारविषयक नोंद केलेली नाही. यामुळे आता आधार क्रमांकाची नोंद करावी, अशा सूचना शिक्षण संचलनालयाकडून दिल्या आहेत. ज्या विद्यार्थ्याकडे आधार क्रमांक नाहीत त्यांनी लॉकडाउन संपल्यानंतर नजिकच्या आधार केंद्रावर आधारकार्ड काढून घ्यावे, असेही परिपत्रकात म्हटले आहे. सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षामध्ये शाळांच्या संचमान्यतेसाठी ज्या विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक स्टूडंट पोर्टलवर नोंदवले जातील, तेवढीच संख्या विचारात घेतली जाणार आहे. त्यामुळे शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक स्टूडंट पोर्टलवर नोंद करण्यासाठी वेळीच कार्यवाही करावी, असेही शिक्षण संचालक यांनी म्हटले आहे. मात्र विद्यार्थ्यांची सर्व माहिती शाळांमध्येच असताना ही माहिती शाळा उघडल्याशिवाय अद्ययावत कशी करणार असा प्रश्न शिक्षकांपुढे उभा राहिला आहे.

शाळा उघडल्यावरही आधार कार्ड काढण्यासाठी विद्यार्थ्यांचे ठसे बायोमेट्रिक मशीनवर घ्यावे लागणार आहेत. सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळताना आणि आरोग्याची काळजी घेताना विद्यार्थ्यांना बायोमेट्रिक ठसे द्यायला लावणे कितपत सुरक्षित असेल असा प्रश्न या निमित्ताने पालकांमधून विचारला जात आहे. त्यामुळे यंदाची संचमान्यता होणार का ? त्यासाठी आधार अद्ययावत करण्याची शिक्षण संचालनालयाची सूचना कितपत योग्य आहे आणि ती कशी अद्ययावत करायची हा प्रश्न उपस्थित होत आहे. राज्याप्रमाणे खालील जिल्ह्यात अद्याप इतके आधार अद्ययावत होणे बाकीचे सल्ल्याची माहिती मिळाली आहे.

जिल्हा - अद्ययावत आधार बाकी
मुंबई - ५५. ५१
पुणे - ४२. ०६
कोल्हापूर - ३२. ७२
औरंगाबाद - ४९. ३९
लातूर - ४५. ५८
अमरावती - ३९. ५०
नागपूर - ३८ . ६७

Web Title: Aadhaar registration required for grouping but how to register?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.