Join us

Mumbai Crime: फटाके फोडण्याच्या वादातून तरुणाची हत्या, मुंबईतील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2024 18:54 IST

Mumbai Crime news in Marathi: मुंबईतील अँटॉप हिल परिसरात एका २० वर्षीय तरुणाची फटाके फोडण्यावरून झालेल्या वादातून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. 

Mumbai Breaking News: फटाके फोडण्यावरून वाद झाला. वाद वाढल्यानंतर एका २० वर्षीय तरुणाची चाकूने वार करून हत्या करण्यात आली. विवेक गुप्ता असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. 

शुक्रवारी अँटॉप हिल परिसरातील जय महाराष्ट्र नगरमध्ये ही घटना घडली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. 

पाच जणांना अटक

मयत तरुण विवेक गुप्ता याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. आरोपींमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. इतर आरोपींचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. 

शंकर गल्लीत फटाके फोडत असताना तिथून आरोपी कार्तिक आर. मोहन देवेंद्र याने दुसरीकडे फटाके फोडण्यास सांगितले. त्यावरून फटाके फोडणाऱ्यांचा कार्तिक सोबत वाद झाला. वाद हाणामारीपर्यंत पोहोचला पण, कार्तिक तिथून निघून गेला.

कार्तिक परत आला अन्...

थोड्या वेळानंतर कार्तिक त्याची पत्नी, भाऊ आणि इतर काही लोकांसोबत तिथे आला. त्यांच्याजवळ काठ्या, क्रिकेट बॅट होती. त्यानंतर दोन्ही गटात वाद सुरू झाला. वाद सुरू असतानाच कुणीतरी चाकू काढला. झटापटीत चाकू खाली पडला. कार्तिक सोबत आलेल्या राज पुट्टी याने चाकू घेतला आणि विवेक गुप्तावर वार केले. 

परिसरातील लोकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी जखमी विवेक गुप्ताला रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. कार्तिक आर मोहन देवेंद्र, कार्तिक कुमार देवेंद्र, विक्की मुत्तू देवेंद्र, मिनियप्पन रवी देवेंद्र आणि कार्तिकची पत्नी यांना पोलिसांनी अटक केली. 

टॅग्स :मुंबईगुन्हेगारीपोलिसदिवाळी 2024