विक्रोळीत कन्नमवार नगरमध्ये तीन तरुणांच्या अंगावर झाड कोसळले; एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 23:28 IST2025-05-26T23:27:25+5:302025-05-26T23:28:14+5:30
विक्रोळी कन्नमवार नगर दोन येथील गणेश मैदान याठिकाणी असलेले जंगली प्रकारचे मोठे झाड मैदानात उभ्या असलेल्या तीन तरुणांच्या अंगावर कोसळले. यात तेजस नायडू वय वर्ष २५ या तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

विक्रोळीत कन्नमवार नगरमध्ये तीन तरुणांच्या अंगावर झाड कोसळले; एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
विक्रोळी कन्नमवार नगर दोन येथील गणेश मैदान याठिकाणी असलेले जंगली प्रकारचे मोठे झाड मैदानात उभ्या असलेल्या तीन तरुणांच्या अंगावर कोसळले. यात तेजस नायडू वय वर्ष २५ या तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. यातील दोघे सुखरूप असून, घटनास्थळी पोलीस व अग्निशमन दल दाखल झाले व या झाडाला कापून आता साईडला करण्यात आले आहे.
मात्र, स्थानिक नागरिकांनी या घटनेला महानगर पालिका प्रशासन जबाबदार असल्याचे सांगितले आहे. कारण हे झाड मुळासकट पडले नसून जी बाजू खराब झाली होती त्या ठिकाणावरून हे झाड खाली कोसळले आहे. त्यामुळे यात मयत झालेल्या तरुणाला मदत करावी व संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
हवामान विभागाकडून हाई टाइडचा इशारा
आज सकाळपासून मुंबईत पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली. दरम्यान, आता पुन्हा एकदा मुंबईसाठी हवामान विभागाने अलर्ट दिला आहे. आज सोमवारी रात्री ११ वाजता समुद्रात ४.१ मीटर उंचीची भरती येईल, या काळात अंदाजे १३ फूट उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मुसळधार पावसाचा अंदाजही दिला आहे. १२. १४ वाजता समुद्रात ४.९२ मीटर उंचीची पहिली भरती येईल. यावेळी समुद्रात १५ फूट उंच लाटा उसळतील. तर मंगळवारी रात्री ११:५४ वाजता ४.०८ मीटर उंचीची भरती येईल. हवामान खात्याने उद्याही मुंबईसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. रायगड आणि कोकणसाठी ऑरेंज अलर्ट आहे. राज्यात उद्याचा दिवसही पाऊस असण्याची शक्यता आहे.