प्रदूषण मोजणाऱ्या स्थानकांचे सर्वेक्षण होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 20:00 IST2025-12-11T19:58:50+5:302025-12-11T20:00:31+5:30
मुंबई शहरात आयआयटीएम, मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सतत हवा मोजमाप करणारी यंत्रणा कार्यरत आहे.

प्रदूषण मोजणाऱ्या स्थानकांचे सर्वेक्षण होणार
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबईतील हवा प्रदूषण कोणत्या घटकांमुळे होते त्याचे सोर्स अर्थातच घटक शोधणे आवश्यक आहे. तरच या प्रश्नावर आपण नियंत्रण मिळवू शकू, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी मुंबईमधील सतत हवा गुणवत्ता संयंत्रणेच्या पाहणी दौऱ्यात केले. कदम यांनी मालाड मालवणी परिसरातील एपीजे अब्दुल कलाम उद्यानातील सतत हवा गुणवत्ता मोजमापन केंद्राला भेट दिली. त्यावेळी त्यांनी या स्थानकातून केल्या जाणाऱ्या मोजमापनाच्या तांत्रिक घटकांची योग्य ती पडताळणी (कॅलिब्रेशन) केली जाते का ? याची पाहणी केली.
मुंबई शहरात आयआयटीएम, मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सतत हवा मोजमाप करणारी यंत्रणा कार्यरत आहे. या यंत्रणेतील तांत्रिक गुणवत्ता अर्थातच कॅलिब्रेशन योग्य पद्धतीचे आहे का ? याची पडताळणी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मुंबई शहरातील सर्व स्थानकांचे सर्वेक्षण करणार आहे.
या भेटीदरम्यान हवा प्रदूषणासाठी कारणीभूत ठरणारे घटक म्हणजेच ज्या ठिकाणी हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक हा मध्यम अथवा धोकादायक पातळीवर जात असेल तर त्या परिसरात कोणत्या घटकांमुळे तेथील हवेच्या प्रदूषणात वाढ होते याबद्दल सर्वेक्षण करणे आवश्यक असल्याचे मत सिद्धेश कदम यांनी यावेळी व्यक्त केले. कदम यांनी बोरिवली नॅशनल पार्क येथील सतत हवा गुणवत्ता मोजमाप संयंत्र स्थानकाला देखील भेट देऊन तेथील हवेची गुणवत्ता कशा पद्धतीने सुधारता येईल, याबाबतचे निर्देश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी व महानगरपालिकेचे अधिकारी यांना दिले आहेत.
ठाणे शहरातील कोपरी येथील मलनिस्सारण केंद्राला कदम यांनी भेट दिली. या केंद्रातून सांडपाणी शुद्धीकरण केलेले पाणी विहित मर्यादित असून यामध्ये मासे देखील सोडण्यात आलेले आहेत. याबद्दल त्यांनी महानगरपालिकेने घेतलेल्या या परिश्रमाचे कौतुक केले. महानगरपालिकेने १२० एम एल डी ची क्षमता वाढवावी आणि या शुद्धीकरण केलेल्या पाण्याचा पुनर्वापर करण्यासंदर्भामध्ये सर्क्युलर इकॉनॉमीच्या माध्यमातून पावले उचलावीत, असे मत त्यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर उपवन येथील सतत हवा गुणवत्ता मोजमापन केंद्राला भेट देऊन त्या परिसरातील हवेच्या प्रदूषणासाठी कारणीभूत ठरणाऱ्या घटकांना नियंत्रित करावे, असे आवाहन त्यांनी उपस्थित अधिकारी वर्गाला केले.
मुंबई आणि अर्थातच एम एम आर परिसरातील हवा प्रदूषण नियंत्रणासाठी संबंधित महानगरपालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सातत्याने देखरेख ठेवणार असून त्यावर तात्काळ उपाय योजना देखील केल्या जाणार आहेत.