Join us  

साधं घर, आईचा आशीर्वाद; शरद पवारांच्या सर्वसामान्य उमेदवारासाठी लोकांनीच जमा केले १० लाख

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2024 1:46 PM

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भगरे गुरुजींचा फोटो ट्विटरवरुन शेअर केला आहे.

मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकांसाठी आता जवळपास महाविकास आणि महायुतीच्या उमेदवारांची घोषणा झाली आहे. त्यामुळे, जवळपास एकमेकांविरुद्धच्या लढतीही स्पष्ट झाल्या आहेत. शरदचंद्र पवार पक्षाकडून ५ उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये, एक शिक्षकाला लोकसभेचं तिकीट देण्यात आलं आहे. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्याविरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून पिंपळगाव बसमत येथील कन्या प्रशाळेत शिक्षक असलेल्या भगरे गुरुजींना मैदानात उतरवण्यात आलं आहे. भगरे गुरुजींच्या प्रचाराला सुरुवात झाली असून, त्यांनी गावी जाऊन आईचे दर्शन घेतले. सर्वसामान्य भगरे गुरुजींसाठी आता लोकवर्गणीतून प्रचारासाठी पैसे गोळा होत असल्याचं आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.  

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भगरे गुरुजींचा फोटो ट्विटरवरुन शेअर केला आहे. त्यामध्ये, भगरे गुरुजी त्यांच्या आईचे दर्शन घेत आहेत. साधारण खोली अन् घरात चूल, आणि लोकसभेच्या मैदानात उतरलेल्या लेकाला आशीर्वाद देणारी आई, या फोटो दिसत आहे. या फोटोसह आव्हाड यांनी माहितीही दिली आहे. त्यामध्ये, लोकवर्गणीतून भगरे गुरुजींच्या प्रचारासाठी पैसे गोळा होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ''आईचे आशीर्वाद घेताना दिसणारी व्यक्ती आहे, ती शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून दिंडोरी लोकसभेचे उमेदवार आहेत. त्यांच्या चांगल्या स्वभावामुळे ते भास्कर भगरे सर म्हणून शिक्षक आणि पालकांत प्रसिद्ध आहेत. सध्या ते पिंपळगाव बसमत येथील कन्या शाळेत शिक्षक आहेत. फोटो निरखून पाहिला तर त्यांच्या घरातील परिस्थिती सहज लक्षात येईल.'', असे आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.  

उमेदवारी जाहीर केल्यानंतर आज वणी येथे इंडिया आघाडीची पहिली बैठक ठेवलेली. या बैठकीला नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. समोरील उमेदवार पैशाने मजबूत असल्याने आजच्या बैठकीला आलेल्या अनेकांनी स्वतः पुढाकार घेऊन ५००, १०००, २००० अशी शक्य ती रक्कम लोकवर्गणी गोळा करून त्यांना दिली. बैठक संपल्यावर त्या जमा झालेल्या लोकवर्गणीची रक्कम मोजली तर दहा लाखाच्यावर झाली होती, हा आकडा हळू हळू वाढत आहे, अशी माहितीही आव्हाड यांनी दिली. 

दरम्यान, या उदाहरणावरून लक्षात येते की, शरद पवारांच्या उमेदवारांची निवडणूक आता ही पक्षाची निवडणूक राहिली नसून ती सर्वसामान्य जनतेने हातात घेतलेली निवडणूक झाली आहे. प्रत्येकजण आपल्या परीने जमेल ती मदत करत आहे. भगरे सर यांच्या सारखा प्रामाणिक शिक्षक लोकसभेत दिसायलाच हवा, अशी लोकांत जनभावना बळावत आहे. त्यामुळे धनाढ्य व्यक्तीला पाडून बदल झाला तर लोकांना आश्चर्य वाटणार नाही, असेही आव्हाड यांनी म्हटले आहे. दिंडोरीत सर्व आमदार महायुतीचे आहेत. त्यातील चार तर एकट्या राष्ट्रवादी अजित पवार गटातील आहेत. त्यामुळे या लढतीला महायुती व महाविकास आघाडीपेक्षा राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातील संघर्षाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. त्यात, शरद पवारांनी एका शिक्षकालाच मैदानात उतरवल्याने ही लढत अधिक रोमांचक होणार असल्याची चर्चा तेथील राजकीय वर्तुळात आहे. 

टॅग्स :दिंडोरीलोकसभा निवडणूक २०२४शरद पवारराष्ट्रवादी काँग्रेसनाशिक