उद्धवसेनेत चलबिचल; आतापर्यंत ३७ माजी नगरसेवक शिंदेसेनेत, गळती रोखण्याचं आव्हान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 07:04 IST2025-01-29T07:04:29+5:302025-01-29T07:04:58+5:30

जे तगडे नगरसेवक शिंदेसेनेत गेले आहेत, त्यांच्या जागी आता तेवढ्याच तुल्यबळ उमेदवाराचा उद्धवसेनेला शोध घ्यावा लागणार आहे.

A set back to Uddhav Thackerays Shiv Sena ahead of the Mumbai Municipal Corporation bmc elections | उद्धवसेनेत चलबिचल; आतापर्यंत ३७ माजी नगरसेवक शिंदेसेनेत, गळती रोखण्याचं आव्हान!

उद्धवसेनेत चलबिचल; आतापर्यंत ३७ माजी नगरसेवक शिंदेसेनेत, गळती रोखण्याचं आव्हान!

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : यशवंत जाधव, परमेश्वर कदम, शीतल म्हात्रे, सुवर्णा करंजे, दिलीप लांडे  आणि आता फायर ब्रँड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माजी नगरसेविका राजूल पटेल यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदेसेनेचा झेंडा हाती घेतला. त्यामुळे आणखी नगरसेवकांची गळती होऊ नये यासाठी उद्धवसेनेला बांधणी करावी लागेल. आतापर्यंत उद्धवसेनेचे ३७ माजी नगरसेवक शिंदेसेनेत गेले आहेत. त्यामुळे मुंबईचा बालेकिल्ला कायम ठेवण्याचे उद्धवसेनेसमोर आव्हान आहे.

राजूल पटेल यांनी दिलेली सोडचिठ्ठी हा पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. पालिका सभागृह गाजवणाऱ्या आक्रमक महिला शिवसैनिकांमध्ये पटेल यांचा समावेश होतो. दोनवेळा त्यांना आमदारकीच्या तिकिटापासून वंचित राहावे लागले होते.  यंदाही विधानसभेला हारून खान यांना उमेदवारी दिल्याने त्या नाराज होत्या. तरीही त्यांनी पक्ष सोडला नव्हता. मात्र सरकार स्थापन झाल्यानंतर दोन महिन्यांनी त्यांनी पक्षाला रामराम ठोकला. 

दुसरीकडे जे तगडे नगरसेवक शिंदेसेनेत गेले आहेत, त्यांच्या जागी आता तेवढ्याच तुल्यबळ उमेदवाराचा उद्धवसेनेला शोध घ्यावा लागणार आहे. आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धवसेनेने पक्षबांधणी सुरू केली आहे. अशा   वेळी महत्त्वाचे माजी नगरसेवक शिंदेसेनेत गेल्याने त्या गटाचे वजन वाढणार असेल तर ते उद्धवसेनेपुढे मोठे आव्हान असणार आहे. 

Web Title: A set back to Uddhav Thackerays Shiv Sena ahead of the Mumbai Municipal Corporation bmc elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.