एखाद्या ‘सुंदरी’चा फोटो तीन मिनिटांत करू शकतो तुमचे बँक खाते रिकामे, ऑनलाइन व्यवहार करताना सावध रहा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 13:47 IST2025-12-04T13:45:29+5:302025-12-04T13:47:58+5:30
‘सुंदरी’चा फोटो पाठवून अवघ्या तीन मिनिटांत चुनाभट्टी येथील व्यावसायिकाचे बँक खाते रिकामे हाेते. याप्रकरणी भोईवाडा पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

एखाद्या ‘सुंदरी’चा फोटो तीन मिनिटांत करू शकतो तुमचे बँक खाते रिकामे, ऑनलाइन व्यवहार करताना सावध रहा
- मनीषा म्हात्रे, मुंबई
गेल्या काही दिवसांपासून शासनाच्या नामसाधर्म्य असलेल्या फसव्या लिंक तयार करून सायबर भामट्यांकडून फसवणुकीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यातच आता ‘सुंदरी’चा फोटो पाठवून त्याखाली लिहिलेल्या मजकुराच्या आडून मालवेअर किंवा व्हायरसद्वारे मोबाइलचा ताबा मिळवल्याच्या घटना डोके वर काढत आहेत.
‘सुंदरी’चा फोटो पाठवून अवघ्या तीन मिनिटांत चुनाभट्टी येथील व्यावसायिकाचे बँक खाते रिकामे हाेते. याप्रकरणी भोईवाडा पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. व्हाॅट्सॲप, टेलिग्राम, एसएमएस, ई-मेलद्वारे आलेल्या एपीके फाइल्समध्ये बाेगस असू शकते. त्यामुळे बँक खाते, वैयक्तिक माहिती चोरी होऊ शकते. अनधिकृत एपीके फाइल्स इन्स्टॉल करूच नका. फ्री ऑफर, बोनस, कॅशबॅकवर विश्वास ठेवून नका. ओटीपी, बँक खाते क्रमांक, पासवर्ड देऊ नका, असे आवाहन पाेलिसांनी केले आहे.
आपको लडकी का फोटो भेजा हैं, सांगितले अन् तीन लाख काढले
१४ नोव्हेंबर रोजी कामानिमित्त परेलला निघाले असताना व्यावसायिकाला अनोळखी नंबरवरून फोन आला. त्या व्यक्तीने, ‘आपको एक लडकी का फोटो भेजा है, अगर आपको चाहिए तो पैसा भेज दो’ असे सांगितले. व्यावसायिकाने त्याकडे लक्ष न देता फोन कट केला. काही वेळातच त्यांच्या व्हॉट्सॲपवर एका सुंदर मुलीचा फोटो व मेसेज आले होते. दुसरीकडे वारंवार फोन येत होते. परंतु, त्यांनी कॉल रिसिव्ह केले नाहीत. काही वेळातच ओटीपीचे मेसेज आल्याने व्यावसायिकाला शंका आली. त्यांनी बँकेच्या कस्टमर केअरला कॉल केला.
मोबाइलवर आलेले ओटीपी कुणालाही शेअर केले नसताना त्यांच्या बँक खात्यातून तीन मिनिटांत ४ लाख ३१ हजार रुपये डेबिट झाल्याचे दिसले. व्यावसायिकाने भोईवाडा पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी त्यांचा मोबाइल चेक केला असता व्हॉटस्ॲप अकाउंट हॅक झाल्याचे समोर आले. याप्रकरणी गुन्हा नोंदवून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. एरव्ही फक्त लिंक धाडून फसवणूक करणारे भामटे आणखीन एक पाऊल पुढे जात फसवणूक करताना दिसत आहेत. अशा वेळी सतर्क राहण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.
कोठे करावी तक्रार?
गुगल किंवा ॲप्पल प्ले स्टोअरमधूनच ॲप डाउनलोड करा. तुमच्यासोबत असे काही घडल्यास त्वरित राष्ट्रीय हेल्पलाइन क्रमांक १९३० किंवा cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवा. चक्षु पोर्टल वापरून संशयास्पद कॉल / संदेशांची तक्रार नोंदवा तसेच नातेवाइक व मित्रांना याबाबत जागरूक करा.
नागरिकांमध्ये सायबर क्राइमबाबत जोरदार जनजागृती सुरू असल्याने अनेकदा भामट्यांच्या लुटीचे ‘लिंक’ फेल होत आहे. हीच बाब लक्षात घेत ऑनलाइन लुटण्यासाठी नवनवीन फंडे वापरण्यात येत आहेत.
सायबर भामट्याकडून पाठवलेला फोटो किंवा त्याखालील पीडीएफ फाइल, मजकुरावर क्लिक करताच सायबर भामटे भ्रमणध्वनी, संगणकाचा ताबा घेऊन त्यातील संवेदनशील माहिती चोरतात. त्याआधारे आर्थिक फसवणूक, माहितीची चोरी, बदनामी किंवा अन्य गुन्हे घडू शकतात.